बेळगाव लाईव्ह : कारवारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाट मार्ग तीन महिन्यांसाठी बंद करण्याचा आदेश दिला असून या मार्गावरून सहाचाकी वाहनांपासून चारचाकी वाहनांना अनमोड घाट मार्ग बंद करण्यात आला आहे. यामध्ये खाजगी व सरकारी बसेसना अनमोड घाटातून परवानगी नसल्याने कर्नाटकातून गोवा राज्यात अनमोड मार्गे जाणाऱ्या प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गोवा सीमेलगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातील अनेक गावातील नागरिक उपचारासाठी बांबोळी येथे कायमस्वरूपी जात असतात. तर अशा रुग्णांनाही ७० ते १०० किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. याचबरोबर कर्नाटक व गोवा राज्यातील रस्त्यावर उपजीविका करणारे गॅरेजवाले, हॉटेल व्यावसायिक आणि इतर व्यावसायिकांबरोबर हजारो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे.
पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनमोड मार्गावर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत असून अनेक प्रवासी देखील अडकून पडले आहेत. अचानक जाहीर झालेल्या निर्णयानंतर पर्यायी व्यवस्थाच नसल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी हत्ती ब्रिज येथे पाणी साचल्यामुळे या ठिकाणी वाहने जाण्यास बंदी घालण्यात आली होती. दोन दिवसांच्या परिश्रमानंतर हत्ती ब्रिज पाइपमधील सर्व गाळ काढून रस्ता खुला करण्यात आला.
परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे दोन दिवसांपासून थांबलेल्या वाहनांना कर्नाटकातून गोवा राज्यात जाण्यास अडवणूक करून अनेक वाहनांना कारवारमार्गे १३० किलोमीटरचा फेरा मारून जावा लागत आहे. यामुळे हि समस्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मंत्रिमहोदयांनी येथील प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिक करत आहेत.