बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील शहापूर स्मशानभूमीमध्ये लवकरच नवीन गॅसदाहिनी उभारण्यात येणार आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीत विद्युत दाहिनीचा प्रकल्प अयशस्वी झाला असला तरी शहापूर येथील गॅसदाहिनी प्रकल्प यशस्वी होईल, असा विश्वास महापालिकेच्या बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
सदर प्रकल्पांतर्गत फक्त गॅसदाहिनी बसवली जाणार नाही तर संपूर्ण स्मशानभूमीची सर्वसमावेशक सुधारणा केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे तब्बल 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महापालिकेने आराखडा आधीच तयार केला आहे. राज्य शासनाच्या नगर पायाभूत सुविधा विकास निधीतून हे काम केले जाणार आहे.
शहरातील स्मशानभूमींची सुधारणा करण्यासाठी हा निधी मागितला होता. या निधीतून महापालिकेने शहापूर स्मशानभूमी सुधारण्यावर भर देण्याचे ठरवले असून मंजूर झालेली संपूर्ण रक्कम या प्रकल्पासाठी समर्पित करण्यात आली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे बांधकाम विभागाने जाहीर केले आहे. राज्य सरकारचा मंजूर निधी स्मशानभूमीत वीज पुरवठा किंवा गॅसदाहिनी उभारण्यासाठी वापरला जाईल.
बेळगाव शहरातील सदाशिवनगर आणि शहापूर या दोन प्रमुख स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यसंस्कार होतात. नवीन गॅसदाहिनी शहरातील भूमिगत पीएनजी गॅस पुरवठ्याशी जोडली जाईल.
अतिरिक्त सुधारणांमध्ये स्मशानभूमीभोवती संरक्षक भिंत बांधणे, पेव्हर्स टाकणे, गटार व्यवस्थीत बांधणे, परिसर लँडस्केप करणे आणि प्रवेशद्वारावर कमान उभारणे यांचा समावेश आहे.
स्मशानभूमीत महापालिकेकडून रखवालदार (केअर टेकर) नियुक्त केले जातात. त्यानुसार शहापूर स्मशानभूमीत नियुक्त रखवालदारासाठी महापालिका एक खोलीही बांधून देणार आहे. एकंदर पूर्वीच्या विद्युतदाहिनी ऐवजी शहापूर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लवकरच गॅसदाहिनी उपलब्ध असणार आहे.