बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेट ओव्हरब्रिज आणि कपिलेश्वर मंदिर रोड ओव्हरब्रिज वरील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष आर. दरेकर आणि ॲड. राघवेंद्र भट यांनी आज एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि ॲड. राघवेंद्र भट यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि रेल्वे प्राधिकरणांना निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात अनेक खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला. हे खड्डे तातडीने न भरल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दरेकर व ॲड. भट या दोघांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती भारताचे राष्ट्रपती, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार आणि पंतप्रधान कार्यालय यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
बेळगाव रेल्वे स्थानकाचे स्थानक व्यवस्थापक दशरत प्रसाद यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते पुढील कार्यवाहीसाठी तातडीने उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या प्रवाशांच्या वारंवार तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पावसाळा जोरात सुरू असताना तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
रस्त्यांची दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.