बेळगाव लाईव्ह : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या भाजप सरकारच्या कालावधीमध्ये बेळगाव शहरातील स्थानिक भाजप नेत्यांनी बुडामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराबाबत मौन बाळगणाऱ्या शेट्टर यांना म्हैसूर मुडा घोटाळ्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपण्णवर यांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहरातील भाजप नेत्यांनी बुडा अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगणमताने लिलावाच्या माध्यमातून भूखंड हडप करून सरकारचे कोट्यावधी रुपये नष्ट केले आहेत. हे बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या व्याप्तीमध्ये घडले आहे याचा नूतन खासदार शेट्टर यांना बहुदा विसर पडल्यासारखे वाटते.
म्हैसूर मुडा घोटाळ्यासंदर्भात म्हैसूरमध्ये बोलणाऱ्या खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव बुडा घोटाळा आणि शहरातील भाजप नेत्यांनी स्मार्ट सिटी योजनेमध्ये केलेला भ्रष्टाचार जिल्ह्यातील जनतेला माहित झाला आहे हे लक्षात घ्यावे. भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार असेल तर खासदार शेट्टर यांनी बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडामधील घोटाळ्याबद्दल भाष्य करावे, असे आव्हान टोपण्णवर यांनी दिले.
बसवेश्वर सर्कल गोवावेस येथील खाऊ कट्ट्याच्या उभारणीत झालेला भ्रष्टाचार, सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून बेळगाव एपीएमसी मार्केट येथे नूतन भाजी मार्केटची उभारणी केली .असताना शहरातील भाजप नेत्यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्गावर शेजारी गांधीनगर येथे उभारले गेलेले खाजगी भाजी मार्केट याबद्दल मात्र खासदार जगदीश शेट्टर वाच्यता करण्यास का तयार नाहीत? असा सवालही राजकुमार टोपण्णवर यांनी केला आहे.