बेळगाव लाईव्ह :कारगिल युद्ध होऊन 25 वर्षे उलटली आहेत. त्यावेळी युद्धात शहीद झालेल्या जवानांची लहान असलेली मुले आता सुशिक्षित मोठी झाली असून आश्वासन दिल्याप्रमाणे या मुलांना सरकारने अनुकंपा आधारावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तात्काळ सरकारी नोकरीमध्ये सामावून घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनांच्या महासंघाचे अध्यक्ष जगदीश पुजेरी यांनी केली आहे.
कारगिल युद्धातील विजयाचे पूर्ण होणारे 25 वे वर्ष यंदा साजरे केले जाणार असून या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनांच्या महासंघातर्फे (बेळगाव डिस्ट्रिक्ट एक्स-सर्व्हिसमॅन ऑर्गनायझेशन्स फेडरेशन) कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार पुजेरी बोलत होते.
ते म्हणाले की, कारगिल युद्धात जे जवान शहीद झाले त्याची त्यावेळी लहान असलेली मुले आज आपले शिक्षण पूर्ण करून मोठी झाली आहेत संबंधित जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान लक्षात घेऊन या मुलांना अनुकंपा आधारे सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. कारगिल युद्धानंतर 25 वर्षांपूर्वी शहीद जवानांच्या कुटुंबांना सरकारने पाच -दहा लाख रुपयांचा सहाय्य निधी देऊ केला.
मात्र त्यानंतर आजपर्यंत त्या कुटुंबांकडे कोणीही फिरकून पाहिलेले नाही. त्यामुळे आज या कुटुंबांची परिस्थिती कठीण झाली आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी आणि आपल्याला एखादी जमीन दिली जावी अशी या कुटुंबांची मागणी आहे.
यासंदर्भात शहीद जवानांच्या कुटुंबांनी अनेक आमदार आणि खासदारांसह गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदने दिली आहेत. मात्र अजूनपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मिळणाऱ्या पेन्शनवरच या कुटुंबांना कसाबसा आपला उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. तथापि अशा परिस्थितीत देखील शहीद जवानांच्या वीर पत्नींनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन मोठे केले आहे.
आर्थिक मदत ही फार दिवस पुरणारी नसते. त्यामुळे शहीद जवानांच्या या मुलांचे भवितव्य शाश्वत उज्वल व्हावे यासाठी आता त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी सामावून घेतले जावे, अशी आमची मागणी आहे, असे अध्यक्ष जगदीश पुजारी यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत फेडरेशनचे गौरवाध्यक्ष रमेश चौगला, उपाध्यक्ष संगप्पा मेटी, सचिव शिवबसप्पा काडण्णावर, पदाधिकारी गणपत देसाई, बसवंतप्पा कारवी, महेश कम्मार, बसवंतप्पा मुगडली आदींसह शहीद जवानांच्या वीर पत्नी आणि त्यांची मुले उपस्थित होती.
पत्रकार परिषदेनंतर प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना कारगिल युद्धातील शहीद जवान भारत मस्के यांच्या पत्नी लक्ष्मी मस्के यांनी आपले पती 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झाल्याचे सांगितले. त्यावेळी आमच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि जमीन देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्या संदर्भात आम्ही सैनिक बोर्डाच्या माध्यमातून निवेदन देण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. मात्र आजतागायत सरकारने दिलेले आपले आश्वासन पूर्ण केलेले नाही. माझे पती शहीद झाले त्यावेळी आमची मुले लहान असल्यामुळे नोकरी करू शकत नव्हती.
पती निधनानंतर मी माझ्या मुलांना चांगले शिकवले आहे अशी माहिती देऊन आता मोठ्या झालेल्या आमच्या मुलांना सरकारी नोकरी सामावून घ्यावे आणि आमच्या नावे एखादी जमीन करून सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी लक्ष्मी भारत मस्के यांनी केली