Wednesday, September 11, 2024

/

शहर परिसरात भक्तीभावाने साजरी होत आहे आषाढी एकादशी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसरात आज बुधवारी आषाढी एकादशी हरिनामाच्या गजरात भक्तीभावाने साजरी केली जात आहे. आषाढी एकादशी निमित्त सजवलेल्या ठिकठिकाणच्या श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरामध्ये आज पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरासह शहरातील विविध ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरांची विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट करण्याबरोबरच मंदिराच्या आत रोषणाई बरोबरच फुलांचे हार, आंबोत्यांनी आकर्षक आरास करण्यात आली आहे.

सदर मंदिरांमध्ये पहाटेपासून काकड आरती, अभिषेक, महापूजा असे धार्मिक विधी सुरू आहेत. यापैकी कांही मंदिरांच्या ठिकाणी पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. भजनी मंडळांचा सहभाग असणारे हे पालखी सोहळे हरिनामासह टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीभावाने पार पडले जात आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी मंडळी आणि भक्तगण करत असलेल्या माऊलींच्या आणि विठ्ठल नामाच्या गजराने पालखीचा मार्ग दुमदुमून जात आहे. आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक श्री विठ्ठल -रखुमाई मंदिराच्या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी बहुतांश मंदिरांच्या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.Ashadhi ekadashi

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत फळांची आवक वाढली आहे. सर्रास सर्व हिंदू बांधव आषाढी एकादशी निमित्त फळे, साबुदाण्याची खिचडी असे अन्न चालू शकणारा उपवास धरतात. त्यामुळे सध्या वेगवेगळ्या प्रकारची फळे बाजारात उपलब्ध झाली आहेत.

काल मंगळवारपासून फळांबरोबरच बाजारातील साबुदाण्याचा खप देखील वाढला आहे. शहरातील जवळपास सर्व भाविकांच्या घरांमध्ये आज साबुदाणा खिचडीचा बेत असल्याचे दिसून येत आहे. आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्त्व लक्षात घेऊन उपहारगृह आणि हॉटेल्समध्ये देखील साबुदाणा खिचडी, साबु वडा असे अन्नपदार्थ ग्राहकांसाठी खास उपलब्ध करण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.