बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना पूर्वीप्रमाणे भक्कम बळकट करण्याकरिता कार्यकारिणीच्या पुनर्रचनेसाठी 13 जणांची शोध कमिटी नियुक्त करण्याबरोबरच पूर्वी 2008 मध्ये स्थापन केलेल्या युवा आघाडी व महिला आघाडी या दोन्ही आघाडी पुन्हा क्रियाशील करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज रविवारी झालेल्या बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. संघटनेच्या कार्यकारणीच्या पुनर्रचनेसंदर्भात बोलविण्यात आलेल्या या बैठकीमध्ये मनोज पावशे, आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, दीपक पावशे, आर. आय. पाटील, विठ्ठल पाटील, शिवाजी शिंदे, मनोहर हुंदरे, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, कमल मन्नोळकर, नारायण सांगावकर, लक्ष्मण होणगेकर, सुभाष मरूचे, शिवाजी खांडेकर, बी. डी. मोहनगेकर, मल्लाप्पा रेमानाचे आदी 20 कार्यकर्त्यांनी आपले मत आणि विचार व्यक्त केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याला नवी ऊर्जा, ताकद मिळावी या दृष्टीने आपले विचार मांडताना कार्यकर्त्यांनी तात्काळ नवी कार्यकारिणी जाहीर करावी असे मत व्यक्त केले आहे. तर कांही कार्यकर्त्यांनी विभागवार समित्या नेमाव्यात. त्यासाठी नावे मागवावीत असे सुचविले. कांही कार्यकर्त्यांनी युवा आघाडी महिला आघाडी स्थापन करावी असे मत मांडले आहे. त्याचप्रमाणे काहींनी प्रथम कार्य करावे चांगले कार्य केले तर लोक आपोआप आकर्षित होतात आणि संघटना मजबूत होते असे सुचविले आहे हे सर्व विचार एकत्रित करून आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समिती आणखी बळकट करायची आहे.
कर्नाटक सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा ठामपणे उभे राहिले पाहिजे. फक्त निवडणुकीपूरती आपली संघटना मजबूत करण्यापेक्षा ही संघटना सीमाप्रश्नाच्या सोडविणुकीसाठी मजबूत करणं, मराठी माणसाची संस्कृती भाषेवर कर्नाटक सरकार घालत असलेला घाला परतवून लावण्याची ताकद निर्माण करण्याकरिता संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही कार्यकर्त्यांनी आपण विकासाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
कार्यकर्त्यांची मते व विचार जाणून घेतल्यानंतर संघटनेची कार्यकारणी पुनर्रचित करण्याच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत 13 जणांची शोध कमिटी नियुक्त करण्यात आली तसेच कार्यकारणी पुनर्रचित करण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्याचे ठरवण्यात आले. याव्यतिरिक्त मागील वेळी 2008 मध्ये ज्या पद्धतीने युवा आघाडी व महिला आघाडी स्थापन केली होती त्याप्रमाणे या दोन्ही आघाडी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन त्यांना देखील क्रियाशील करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आजच्या बैठकीसंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की, आज बोलवण्यात आलेल्या बैठकीत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती ही संघटना पुनर्रचित करून मजबूत करणे या संदर्भात कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेण्यात आले. गेल्या 2009 मध्ये ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानंतर तरूण कार्यकर्त्यांना सीमा लढ्यात सामील करून घ्यावे अशी गेली दोन-तीन वर्षे कार्यकर्त्यांची सातत्याने मागणी होती. तरुण कार्यकर्त्यांना लढ्यात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना संघटनेत पदावर नेमले पाहिजे.
त्या दृष्टीने आज सर्व कार्यकर्त्यांचे विचार व मते जाणून घेतल्यानंतर गेल्या 26 मे रोजी जी 1 जूनच्या संदर्भात बैठक झाली त्या बैठकीत आणि 1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करताना देखील सांगितलं होतं की आजची ही व्यापक बैठक घेतली जाईल. त्यानुसार आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत जवळपास 20 कार्यकर्त्यांचे विचार व मते जाणून घेऊन एक शोध कमिटी नेमण्यात आली आहे. ही शोध कमिटी प्रत्येक गावोगावी जाऊन आपल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रत्येक गावातून चार-पाच निवडक नांवे घेऊन विस्तृत अशी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची रचना केली जाईल. त्यानंतर त्या कार्यकारणीतून सुकाणू समिती, मध्यवर्ती समितीचे सदस्य, निवड समिती या पुढच्या सर्व गोष्टी होतील. या पद्धतीने या सर्व समित्यांच्या माध्यमातून संघटना बळकट करून कर्नाटक सरकारची लढा देणे अत्यंत गरजेचे आहे. कर्नाटक सरकार एकीकडे फलकांवर कन्नडची सक्ती, मराठी शाळांमध्ये बंदी, कर्नाटकमध्ये राहायचे असेल तर कानडी बोलता आले पाहिजे या पद्धतीच्या ज्या वल्गना करत आहे. त्याला जर उत्तर द्यायचे असेल आणि मराठी भाषा संपविण्याचा सरकारचा डाव हाणून पाडायचा असेल तर संघटना मजबूत असणं अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी विचार मांडले. आता संघटनेची कार्यकारणी पुनर्रचित करण्याचे काम येत्या मंगळवारपासून सुरू केले जाईल.
त्याचप्रमाणे 13 जणांची कमिटी प्रत्येक गावाकडे बैठका घेऊन त्याप्रमाणे पुनर्रचनेचे काम करेल आणि नव्या कार्यकारणीची घोषणा करेल. त्याचप्रमाणे मागील वेळी 2008 मध्ये आम्ही ज्या पद्धतीने युवा आघाडी व महिला आघाडी स्थापन केली होती.
त्याप्रमाणे या दोन्ही आघाडी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी येत्या आठवड्यामध्ये त्यांच्या सुद्धा बैठका घेऊन त्यांना देखील क्रियाशील करण्यासाठी प्रयत्न करणं हे देखील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अगत्याचा काम असेल, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केले.