बेळगाव लाईव्ह : दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली असून येत्या १४ जून पासून दहावीच्या पुनर्परीक्षेला सुरुवात होणार आहे.
दि. १४ जून ते २२ जून यादरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ४१ अशा एकूण ७४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा शांततेत व सुरक्षीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात 200 मीटरच्या अंतरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिली.
मुख्य परीक्षेप्रमाणेच या परीक्षेवेळीही वेबकास्टींगद्वारे सीसीटीव्हीचे फुटेज तालुका पंचायत, जिल्हा पंचायत तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयात मोठ्या स्क्रीनवर पाहिले जाणार आहेत. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांवर नजर असणार आहे.सीसीटीव्हीची नासधूस केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने परिश्रम घेतले आहेत. परीक्षा काळात परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थी, परीक्षा कर्मचारी, शासन नियुक्त कर्मचारी, सुरक्षारक्षक वगळता इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
परीक्षा काळात सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी हेस्कॉम अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत परीक्षेसंदर्भाचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी उपस्थित होते.