बेळगाव लाईव्ह :बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे हे मी यापूर्वीच सांगितले आहे. माझ्यावर परका उमेदवार म्हणून लेबल चिकटवणाऱ्यांना बेळगावच्या जनतेने मला बहुमताने निवडून देऊन चोख उत्तर दिले आहे, असे बेळगावचे नवे खासदार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयानंतर शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भाजपच्या या विजयामुळे मोदीजींना आणखी बळ मिळाले आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांनी चार वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याच्या निधनानंतरही पोटनिवडणुकीत सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगल अंगडी यांना विजय मिळवला होता.
भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी आमदार माजी आमदार बूथ पातळीवरील कार्यकर्ते सर्वांनीच संघटितपणे विशेष परिश्रम घेतले आहेत. मला 1 लाख 75 हजार इतक्या मोठ्या मत फरकाने विजयी करणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदार संघातील समस्त जनता आणि कार्यकर्त्यांचा मी चिरऋणी आहे, असे खासदार शेट्टर पुढे म्हणाले.
काँग्रेस दररोज टीका टिप्पणी करत होती मात्र त्यांना आता जनतेनेच उत्तर दिले आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या विकासाचे अनेक स्वप्न पाहिली होती ती साकारण्याचा मी प्रयत्न करेन. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट्स तयार केले जातील. मला सर्वाधिक मतदान करून विजयी करणाऱ्या ग्रामीण मतदार संघाला विकासामध्ये प्राधान्य दिले जाईल. या खेरीज बेळगावमध्ये जास्तीत जास्त उद्योगधंदे निर्मितीचा माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पालकमंत्री आणि खासदार यांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. मी परका नाही. माझे मतदान देखील मी बेळगावमध्ये वर्ग करून घेतले असून बेळगावच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.
काँग्रेस कधीही स्पष्ट बहुमताने सत्तेवर आलेले नाही. तथापि मोदीजींनी दोन वेळा म्हणजे 10 वर्षे स्पष्ट बहुमतात येऊन आपले सरकार स्थापन केले आहे. एनडीएला यावेळी देखील स्पष्ट बहुमत मिळालेले नाही असे सांगून नरेंद्र मोदी यावेळी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वासही खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.