बेळगाव लाईव्ह :वेळच्यावेळी साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे जुना पी. बी. रोड टीचर्स कॉलनी येथील रस्त्या शेजारील भूमिगत कचराकुंड ओसंडून वाहत असून कुंडाच्या आसपास कचऱ्याच्या पिशव्यांचे दुर्गंधीयुक्त साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वेळच्यावेळी स्वच्छता केला जात नसल्यामुळे जुना पी. बी. रोड टीचर्स कॉलनी येथील रस्त्या शेजारील भूमिगत कचराकुंड सध्या तुडुंब भरला आहे. कुंड तुडुंब भरल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून कुंडाच्या ठिकाणी खुल्या जागेत प्लास्टिकच्या पिशव्यांतून कचरा फेकला जात आहे.
परिणामी या कुंडाच्या आसपास कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाली असून तेथे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
बेळगाव दक्षिणच्या आमदारांकडून भूमिगत कचरा कुंडाचा स्तुत्य प्रकल्प सुरू करण्यात आला असला तरी बेळगाव महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे टीचर्स कॉलनी येथील भूमिगत कचराकुंडाला स्वच्छ बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
परिणामी सार्वजनिक ठिकाणी खुल्यावर अस्वच्छता पसरवू नये यासाठी राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प सपशेल अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे. जर महापालिकेलाच पूर्वीप्रमाणे खुल्या वरील अस्वच्छता ठीक वाटत असेल तर हे भूमिगत कचराकुंड कशाला हवे होते? त्यांच्यासाठी लाखोचा खर्च कशाला केला गेला? असा संतप्त सवालही केला जात आहे.
त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने शहरातील स्मार्ट सिटीचे बहुतांश प्रकल्प दिवसेंदिवस अपयशी ठरत आहेत. तीच गत या कचराकुंडांची होणार असल्याचा आरोपही केला जात आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापौर आणि मनपा आयुक्तांनी याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावे.
तसेच आरोग्य विभागाची कानउघडणी करून फक्त जुना पीबी रोड टीचर्स कॉलनी रस्त्याशेजारीलच नव्हे तर शहरात अन्यत्र असलेले भूमिगत कचराकुंड वेळच्या वेळी साफ करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.