बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहर परिसरात आज सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद-उल-अधा (बकरी-ईद) सण सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे.
बकरी ईद निमित्त आज सकाळी शहरातील ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या प्रमुख मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठनाचा कार्यक्रम पार पडला.
मुस्लिम बांधवांच्या महत्त्वाच्या सणापैकी एक असलेला बकरी ईद सण आज शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. धार्मिक परंपरेनुसार सदर सणाच्या निमित्ताने शेकडो मुस्लिम बांधवांनी आज शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले.
यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. खरा सच्चा मुसलमान गोश्त अर्थात प्राण्यांचे मांस खातच नाही. त्यामुळे त्यांची कुर्बानी देण्याचा अर्थात बळी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खरे तर गोश्त खाणे जरुरीचे नाही. प्राण्यांचे बळी दिल्यानंतर त्यांचे मांस, रक्त अल्लापर्यंत कधीच पोहोचत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आपण मनापासून श्रद्धेने केलेली प्रार्थना, आचरणात आणलेला उपवासच (रोजे) अल्लापर्यंत पोहोचतो, असे स्पष्ट करून मुस्लिम धर्मगुरूंनी बकरी ईद सण आणि नमाजाचे महत्त्व विशद केले.
दरम्यान, बकरी ईद सणादिवशी कुर्बानीला महत्त्व असल्याने गेल्या दोन दिवसापासून मुस्लिम बांधवांकडून बोकड, शेळी, पालवे आणि मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना पहावयास मिळाली. शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी बाजारामध्ये तर गेल्या शनिवारी बकरी, पालवे यांच्या खरेदीसाठी एकच गर्दी होऊन लाखोंची उलाढाल झाली.
एकंदर सध्या शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ईद साजरा करण्यामध्ये सर्वजण मग्न असल्याचे दिसून येत आहे. ईद-उल-अधा अर्थात बकरी-ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.