बेळगाव लाईव्ह:अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठ पर्यंतच्या खराब झालेल्या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी पालकमंत्र्यांकडे धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात यापूर्वी केलेल्या मागणीची आठवण करून देणाऱ्या पत्राद्वारे पुन्हा उपरोक्त मागणी केली आहे.
संबंधित रस्ता अतिशय खराब झाला असून त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, रुग्ण आणि प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांना मोठा त्रास होत आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुरावस्था होणार आहे.
तेंव्हा तत्पूर्वी सदर जवळपास 120 मीटर अंतराच्या रस्त्याचे युद्ध पातळीवर डांबरीकरण करण्यात यावे. या रस्त्या शेजारील भुयारी गटारांचे (ड्रेनेज) काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्याचे डांबरीकरण अद्याप प्रलंबित आहे.
खराब झालेल्या रस्त्यामुळे या ठिकाणची बससेवा देखील अनगोळ शेवटचा स्टॉप म्हणजे गांधी स्मारकापर्यंत पोहोचेनाशी झाली आहे.
तेंव्हा या प्रकरणी गांभीरणे लक्ष देऊन संबंधित खात्याला अनगोळ धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठपर्यंतच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याचे आदेश दिले जावेत, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक गुंजेटकर यांच्या निवेदनात नमूद आहे.