बेळगाव लाईव्ह विशेष/ श्री महालक्ष्मी यात्रोत्सव विशेषबेळगाव तालुक्यात मोडणारी अनेक गावे आहेत. प्रत्येक गावाचे विशेष असे वैशिष्ट्य आहे. अशाच गावांपैकी पूर्व भागात मोडणारे एक गाव म्हणजेच सांबरा…!
बेळगाव जिल्ह्यातील मोजक्या मराठमोळ्या गावांपैकी एक असणारे सांबरा हे येथील विविध वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे. सांबरा गावात असणारे व्यवसाय, शेती, वायुसेना प्रशिक्षण केंद्र यासह विविध धार्मिक गोष्टींचा वारसा घेऊन आपली ओळख निर्माण करणारे गाव म्हणजेच सांबरा….सांबरा गावची श्री महालक्ष्मी यात्रा १८ वर्षानंतर भरविण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर या गावच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा घेतलेला आढावा…
सांबरा गावात नैसर्गिकरित्या गुळाचे उत्पादन घेतले जाते. आजही या भागात गुऱ्हाळ घरे सुरु आहेत. गुळापासून बनणारे काकवी, चिकट गूळ यासारखे उपपदार्थ पारंपारिकरित्या येथे बनविले जातात. बेळगावमधील अनेक ठिकाणची गुऱ्हाळ घरे नामशेष होत असली तरी आजही सांबरा गावात गुऱ्हाळघरे टिकून आहेत. या भागात किमान १४ ते १५ गुऱ्हाळ घरे सुरु असून ऑक्टोबर ते मार्च-एप्रिल पर्यंत गुऱ्हाळ घरांचा व्यवसाय सुरु असतो.
या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शेवया उत्पादन. गृहोद्योगाच्या माध्यमातून सांबरा गावात शेवया बनविल्या जातात. १९९६ साली याठिकाणी शेवया बनविण्याची पहिली मशीन स्थापन करण्यात आली. आज जवळपास १५ कुटुंबातून शेवया उद्योग सुरु असून या माध्यमातून ६० ते ७० महिलांना रोजगार मिळत आहे. शिवाय सांबरा गावात मिळणाऱ्या शेवया या प्रसिद्ध आहेत. आजवर अनेक ठिकाणी शेवया उद्योग स्थापन करण्यात आले मात्र सांबरा गावात मिळणाऱ्या शेवयांसारखी चव आणि दर्जा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही.
गूळ, शेवया याप्रमाणेच येथील विणकर समाज देखील सांबरा गावच्या वैशिष्ट्याचा एक भाग आहे. हातमागापाठोपाठ याठिकाणी यंत्रमाग देखील सुरु असून देवांग समाजातील कुटुंब आजही यंत्रमागची परंपरा टिकवून आहेत. या भागात सुमारे ८० यंत्रमाग असून यंत्रमागाच्या माध्यमातून घेणारे उत्पादनही बेळगाव जिल्ह्यासह सर्वत्र प्रसिद्ध आहे.
या गावाला धार्मिकतेचीही मोठी जोड आहे. श्री रेणुकादेवी, ३ ठिकाणी असलेली श्री मारुती मंदिर, श्री लक्ष्मीदेवी मंदिर, गावाच्या मध्यवर्ती भागात असणारे श्री दुर्गादेवी मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री कलमेश्वर मंदिर, श्री भैरीदेव मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री बनशंकरी मंदिर, श्री बसवण्णा मंदिर यासह कलावती माता हरमंदिर अशी अनेक देवस्थान, मंदिरे या गावात आहेत.
मराठी संस्कृती जपणारे कट्टर गाव म्हणून या गावाची ख्याती आहे. या गावात असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हे येथील केंद्रबिंदू आहे. गावात कोणतेही शुभकार्य असो, वाढदिवस, लग्न, सण, उत्सव, समारंभ किंवा कोणताही घरगुती, सार्वजनिक कार्यक्रम प्रत्येक शुभकार्याची सुरुवात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या पूजनाने सुरु होते, हे विशेष! इतकेच नाही तर गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीकडून आळीपाळीने दररोज शिवमूर्तीचे पूजनही केले जाते. या भागात ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवून मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा जागर केला जातो.
शेतजमिनीने समृद्ध असलेल्या या गावात खरीप हंगामात भात आणि ऊस हि दोन मुख्य पिके घेतली जातात तर रब्बी हंगामात मसूर, वाटाणा, हरभरा अशी पिके घेतली जातात. गावच्या माळरान जमिनीवर जोंधळा आणि सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते.
भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक वैशिष्ट्याप्रमाणेच या भागाचे शैक्षणिक महत्वही मोठे आहे. या भागात आंतरराष्ट्रीय स्तरावरील वायुसेना प्रशिक्षण केंद्र आहे. नॉन टेक्निकल क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी देशातील सैनिकाचे एकमेव प्रशिक्षण केंद्र सांबरा गावात आहे. याठिकाणी देशांतर्गत विमानतळ देखील असून कर्नाटकातील तिसरे महत्वाचे विमानतळ म्हणून येथील विमानतळाचा समावेश होतो.
या गावाने क्रीडा क्षेत्रातही नाव उंचावले असून कर्नाटकात कुस्ती क्षेत्रात पहिले राष्ट्रकुल पदक मिळविणारे कै. शिवाजी चिंगळे हेदेखील याच गावाचे सुपुत्र होते. गेल्या १५ दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले. मात्र त्यांनी आपल्या कामगिरीने सांबरा गावचे नावही उंचावले आणि अनेक प्रक्षिणार्थीही तयार केले.
अशा या वैविध्यपूर्ण गावात १८ वर्षानंतर लक्ष्मी यात्रा भरविण्यात येत असून येथील लक्ष्मी मूर्ती अत्यंत देखणी अशी आहे. सौंदर्य शास्त्राच्या नियमाला अनुसरून, अनुरूप अशी अष्टभुजा श्री महालक्ष्मीची मूर्ती आहे. १९०४, १९१७, १९५०, १९८६, २००६ आणि यंदा भरविण्यात येणारी २०२४ सालची हि सहावी यात्रा आहे.
मंगळवार दि. १४ मे पासून सुरु झालेली हि यात्रा २२ मे पर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान रथोत्सव, ओटी भरणे यासह विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. बुधवार दि. २२ मे रोजी सायंकाळी देवी गदगेवरून उठून सीमेकडे प्रस्थान करेल. त्यानंतर यात्रेची सांगता होईल. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात सर्व मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला असून यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग, वाहतूक, सुरक्षा अशी सर्व दृष्टिकोनातून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.