Sunday, June 16, 2024

/

आनंदनगर नाल्यातील अतिक्रमण हटवण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आनंदनगर, वडगाव येथील सर्व्हे नं. 215/6बी या सरकारी जागेतून जाणाऱ्या 14 फूट रुंदीच्या नाल्यामध्ये जे अतिक्रमण करण्यात आले आहे ते युद्धपातळीवर हटवण्यात यावे, अशी मागणी आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

वडगाव येथील आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आनंदनगर, वडगाव येथील सर्व्हे नं. 215/6बी या सरकारी जागेतून जाणाऱ्या 14 फूट रुंदीच्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

त्यामुळे विशेष करून जोराचा पाऊस पडल्यानंतर नाल्यातील पाणी अडवून ओव्हरफ्लो होण्याद्वारे आनंदनगर आणि साई कॉलनी मधील घराघरांमध्ये शिरत आहे या खेरीज अतिक्रमण करून केलेल्या बांधकामामुळे नाल्यातील सांडपाणी अडून आसपासच्या विहिरींमध्ये झिरपत असल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत आहे त्यासाठी संबंधित अतिक्रमण हटवून सदर नाल्याचा योग्य प्रकारे विकास केला जावा अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 belgaum

त्याचप्रमाणे नाल्यात अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्यांपैकी काही जणांकडून मद्यपान करून अथवा रस्त्यावर आपल्या गाड्या लावून आसपासच्या रहिवाशांना विनाकारण त्रास दिला जात असल्याची तक्रार ही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.Aanand nagar

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना युवा कार्यकर्ता बाळू गोरल याने सांगितले की, पावसाळ्यात सदर नाल्यामुळे केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर वगैरे संपूर्ण भाग जलमय होतो. नाल्यामध्ये केलेल्या अतिक्रमणाचा हा परिणाम आहे. सदर अरुंद झालेल्या नाल्याची रुंदी वाढवून त्याचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र त्यामध्ये कांही विघ्नसंतोषी मंडळी अडथळा आणत आहेत. सीडीपी नकाशाप्रमाणे नालाबांध अशी सूचना करणाऱ्या खुद्द रहिवाशी संघटनेच्या अध्यक्षानेच नाल्याच्या ठिकाणी 20 फूट अतिक्रमण करून घर बांधले आहे. ते अतिक्रमण प्रथम हटवले गेले पाहिजे. आमची एकच मागणी आहे, काहीही करा परंतु पावसाळ्यापूर्वी नाल्याचा विकास झाला पाहिजे, अन्यथा पावसाळ्यात परिस्थिती बिकट होणार आहे, असे गोरल याने सांगितले. मागच्या रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाला ओव्हर फ्लो होऊन रस्ता पाण्याखाली जाण्याबरोबरच 25 ते 30 घरांमध्ये गुडघाभर पाणी आले होते.Aanand nagar

त्यामुळे आमच्या भागातील नाल्याचे विकास काम तात्काळ झाले नाही तर दरवेळी पावसात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नुकसान होत राहणार आहे. तेंव्हा नाल्याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे असे अन्य एका रहिवाशाने सांगितले. येळ्ळूर रोड वडगाव येथील लक्ष्मी कणबरकर या महिलेने अलीकडे झालेल्या मुसळधार पावसात आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नाल्याचे सांडपाणी केरकचरा शिरल्याने लॅपटॉप, धान्य, कपडेलत्ते, गाद्या -अंथरूनं वगैरे सर्व भिजून मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.

या नुकसानीला कोण जबाबदार? असा सवाल करून आमच्या भागातील नाल्यामध्ये अतिक्रमण करून घरे बांधण्यात आल्यामुळे हे घडत आहे. माझी मुलगी एमबीए करते तिचा लॅपटॉप खराब झाला मुलाची अभ्यासाची पुस्तके खराब झाली कपाटातील तिजोरीत पाणी शिरले याला कोण जबाबदार? आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच भविष्यात असे घडू नये यासाठी तात्काळ नाल्याचे विकास काम केले जावे, अशी मागणी कणबरकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.