बेळगाव लाईव्ह विशेष : आपला समाज एकत्रित यावा, आचार – विचारांची देवाणघेवाण व्हावी या दृष्टिकोनातून पूर्वापार बहुजन समाजाने अनेक चालीरीती प्रचलित केल्या. या चालीरीती जपताना आपली परंपराही जपली जावी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक वारसा सोपविला जावा, या हेतूने अनेक चालीरीती आजवर सुरु आहेत.
कौटुंबिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक चालीरीती पूर्वापार आजतागायत सातत्याने पुढे येत गेल्या. मात्र काळाच्या ओघात शैक्षणिक वारसा काहीसा मागे पडू लागल्याचे चित्र दिसून आले. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, टीव्ही, प्रसारमाध्यमे, बदलत्या जगानुसार सुरु असलेल्या चालीरीती त्यानंतर कालांतराने मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली सोशल मीडिया… या सर्व ओघात मराठी संस्कृती आणि मराठीचा ठेवा जपणाऱ्या शैक्षणिक संस्था मात्र मागे पडू लागल्या.
स्पर्धात्मक युगात टिकाव लागावा यासाठी अनेक पालकांनी मातृभाषेतील शाळांकडे पाठ फिरवली. इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे पेव फुटले.
अनेकांना इंग्रजी माध्यम शाळा याच आपल्या मुलांसाठी तारणहार वाटू लागल्या. मात्र या ओघात मराठी शाळा मात्र मागे राहिल्या. सीमाभागात आधीच मराठी शाळांवर असणारी वक्रदृष्टी आणि कमी होत चाललेली पटसंख्या या गोष्टी हेरून कित्येक स्वाभिमानी मराठी भाषिकांनी पुढाकार घेऊन मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यापैकी एक असलेले सांबरा गावातील मोहन शंकर हरजी!
प्रत्येकालाच आपल्या शाळेचा अभिमान असतो आणि हा अभिमान त्यांच्याकडून वेळोवेळी प्रकट केला जात असतो. सांबरा येथील ‘सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचे’ माजी विद्यार्थी व विद्यमान शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मोहन शंकर हरजी यांनीही शाळेबद्दलचे प्रेम, अभिमान तसेच मराठी शाळा टिकल्या पाहिजेत हा आपला उद्देश अभिनव पद्धतीने प्रकट करताना निमंत्रण पत्रिकेत चक्क आपल्या शाळेचा उल्लेख केला आहे.
बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात येणाऱ्या सांबरा या गावचा श्री महालक्ष्मी यात्रोत्सव 18 वर्षानंतर साजरा होत आहे. मंगळवार दि. 14 मे ते बुधवार दि. 22 मे 2024 या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहन हरजी यांनी निमंत्रण पत्रिकेत चक्क आपल्या मराठी शाळेबद्दल अभिमान व्यक्त करत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
निमंत्रण पत्रिकेतील मजकुरात पै – पाहुण्यांची नावे समाविष्ट न करण्यात आल्याने अनेकांच्या कुटुंबात वाद होतात. मात्र या गोष्टीला फाटा देत मोहन हरजी यांनी निमंत्रण पत्रिकेच्या शेवटी आपल्या शाळेचा उल्लेख करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये तळाशी ‘शाळा म्हणजे जीवन कसे जगावे हे शिकवणारे केंद्र’ या शीर्षकाखाली शाळेची इमारत दर्शविण्यात आली असून त्याच्या शेजारी ‘मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण’ या शीर्षकाखाली सुसज्ज इमारत, प्रशस्त मैदान, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, अनुभवी आणि कार्य तत्पर शिक्षक आदी सोयीसुविधा उपलब्ध असणारी आमची सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सांबरा ता. जि. बेळगाव ‘आमच्या गावची शाळा सुंदर शाळा’, असा अभिमानास्पद मजकूर छापण्यात आला आहे.
या पद्धतीने यात्रेच्या निमंत्रणासह शाळेबद्दलचे आपले प्रेम आणि अभिमान प्रकट करण्याबरोबरच मराठी शाळा टिकाव्यात यासाठीच्या मोहन हरजी यांच्या या अभिनव प्रयत्नाचे यात्रेचे निमंत्रण मिळालेल्या सर्वांमध्ये कौतुक होत आहे.
सर्वसामान्यपणे अशा निमंत्रण पत्रिकांमध्ये सर्वांना माहीत व्हावे म्हणून निमंत्रक आपले आई वडील, आदरणीय व्यक्ती किंवा आपला व्यवसाय, हुद्दा वगैरे माहिती छायाचित्रासह पत्रिकेत शेवटी तळाला प्रसिद्ध करतात. तथापि मोहन हरजी यांनी समाविष्ट केलेल्या शाळेविषयीच्या मजकुरामुळे मराठीचा अभिमान अधोरेखित झाला आहे.
महादेवनगर, सांबरा येथील रहिवासी असलेल्या मोहन शंकर हरजी यांनी आपले शालेय शिक्षण स्वतः शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष असलेल्या सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत 1997 मध्ये पूर्ण केले आहे. व्यवसायाने प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर असणारे हरजी यापूर्वी तीन वेळा शाळा सुधारणा समितीचे सदस्य राहिले असून सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ते पूर्वीपासून सातत्याने झटत असतात. विशेष म्हणजे कोरोना काळापासून दर रविवारी मोहन हरजी व त्यांचे सहकारी शाळेच्या दोन्ही व्हराड्यांची स्वच्छता आणि आवारातील झाडांना पाणी घालण्याचे आदर्शवत कार्य आजपर्यंत न चुकता नेमाने करत आहेत. आपली शाळा टिकावी, वृद्धिंगत व्हावी यासाठी झटणारे मोहन हरजी गावातील सामाजिक कार्यात देखील आघाडीवर असतात.
शाळेबद्दलचे प्रेम, अभिमान प्रकट करण्याबरोबरच बेळगावसह सीमाभागात मराठी शाळा टिकाव्यात आणि वाढाव्यात हा देखील निमंत्रण पत्रिकेवर शाळेचा उल्लेख करण्याचा एक मुख्य हेतू असल्याचे हरजी यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना सांगितले.