बेळगाव लाईव्ह :सदाशिवनगर स्मशानभूमीमधील शेडला गेल्या सहा महिन्यापासून छताचे पत्रेच नाहीत. त्यामुळे सध्याचा तीव्र उन्हाळा आणि वळीव पावसामध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून सदर शेडचे पत्रे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ बसवण्यात यावेत, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे व एफएफसीचे संतोष दरेकर यांनी केली आहे.
उन्हा -पावसात अंत्यसंस्कार करणे सोयीचे जावे यासाठी सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये पूर्वीपासून मोठ्या शेडची उभारणी करण्यात आली आहे. या शेडवर अनेक वर्षापासून असलेले पत्रे गंजून खराब झाल्यामुळे काढून टाकण्यात आले होते. मात्र त्यानंतर नव्याने पत्रे घालण्यात आले नाहीत.
त्यामुळे गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून या शेडच्या ठिकाणी उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र अलीकडे तीव्र उन्हाळा सुरू झाल्यापासून तसेच आत्ता पडणाऱ्या मुसळधार वळीव पावसामुळे शेडला वर छताचा निवारा नसल्याने गैरसोय होत आहे. प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाल्यास परिस्थिती अधिकच बिकट होऊन अंत्यसंस्कार करणे कठीण जाणार आहे.
तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापालिका प्रशासनाने जूनमध्ये पावसाला सुरुवात होण्यापूर्वी सदाशिवनगर येथील अंत्यसंस्कारासाठी असलेल्या शेडवर पत्रे बसवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे आणि एफएफसीचे प्रमुख संतोष दरेकर यांनी केली आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना संतोष दरेकर यांनी सदाशिवनगर स्मशान भूमीतील शेडला गेल्या 6 महिण्यापेक्षा अधिक काळापासून पत्रे घालण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कारास येणाऱ्यांना त्रास होत आहे अशी माहिती देऊन प्रशासनाने सदर शेडची लवकरात लवकर दुरुस्ती करून पत्रे घालावेत आणि अंत्यसंस्कारासाठी येत्या पावसाळ्यात नागरिकांना निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.