बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याने गाठली शाळा, अन् दिली देणगी बेळगाव लाईव्ह :माणूस कितीही मोठा झाला तरी बालपण विसरू शकत नाही आणि बालपणातील महत्त्वाची आठवण म्हणजे शाळा, शिक्षिका व वर्गातील मित्र-मैत्रिणी.
प्रत्येकालाच आपल्या शाळेचा अभिमान असतो मग ती सरकारी असो किंवा खाजगी असो कारण त्या शाळेशी आपल्या रम्य अशा निखळ आठवणी निगडित असतात. म्हणूनच एका नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तडक सर्वप्रथम आपली शाळा गाठली आणि शाळेला देणगी दिली.
सदर नवरदेव माजी विद्यार्थ्याचे नांव नारायण मारुती धर्मोजी असे असून सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, सांबरा ही त्याची शाळा आहे. आजच नारायण याचा विवाह झाला. मात्र विवाहाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याने प्रथम थेट सांबरा येथील आपल्या शाळेला भेट दिली.
यावेळी सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मोहन हरजी यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी आपल्या विवाह प्रित्यर्थ नारायण धर्मोजी याने शाळेला आर्थिक देणगी दिली.
आणि देणगीचा धनादेश मोहन हरजी यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी पागाद सर, विजू बसरीकट्टी सुनील धर्मोजी आदींसह नवरदेव नारायण याचे मित्र उपस्थित होते. अलीकडच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्यांकडून आपले वाढदिवस अथवा लग्नाचे वाढदिवस अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात, गोरगरिबांसमवेत साजरे केले जातात.
नारायण धर्मोजी याने डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडण्याआधी आपल्या शाळेला मदत करून आगळा पायंडा बेळगाव परिसरात पाडला आहे. आपल्या प्रिय शाळेला आर्थिक मदत करून नव्या वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करण्याच्या त्याच्या या कृतीचे शिक्षणप्रेमींमध्ये कौतुक होत आहे.