बेळगाव लाईव्ह विशेष :(नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आणि त्यात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून मच्छे गावची तनिष्का शंकर नावगेकर या सेंट मेरी हायस्कूलच्या विद्यार्थिनीने 620 गुणांसह प्रथम क्रमांक संपादन केला तिच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली बातचीत)
*तनिष्का तुझ्या या यशाचे गमक काय?*
सर, जिद्द हे माझ्या यशाचे खरे गमक आहे. मी ज्या सेंट मेरी शाळेत लोवर केजी पासून दहावीपर्यंत शिकले त्या माझ्या शाळेतील सर्व स्पर्धात भाग घेण्याची मला सुरुवातीपासून आवड. त्यातूनच मी एनसीसी जॉईन झाले. आणि एनसीसी तून कर्नाटक व गोव्याचे प्रतिनिधित्व करीत दिल्लीला 2022 साली गेले. त्यावेळी फायरिंग मध्ये मी भाग घेतला. मी जरी यश मिळवले नाही तरीही या घटनेने माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडविला. माझे तीन महिने दिल्लीमध्ये गेले. त्यामुळे माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले .त्यामुळे मी नववीत अपेक्षित यश मिळवू शकेन की नाही हे मला कळत नव्हते. असे असताना गुरुजनांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे इयत्ता नववीत मी शाळेतील तिन्ही डिव्हिजनमध्ये प्रथम आले. या घटनेने माझ्यात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आणि आमच्या शिक्षकांनी तू दहावीला नक्कीच चांगले यश मिळू शकशील असा विश्वास दिला. आणि मग एस एस यल सी ला राज्यात प्रथम येण्याच्या ध्येयाने मी कार्याला लागले. जिद्दीने आणि मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता मी अभ्यास केला त्यातून मला हे यश संपादन करता आले.
*एन सी सी चा आणखी कसा उपयोग झाला?*
सर, खरं सांगू मी तशी धाडसी नव्हते .पण एनसीसी ने मला धाडसी बनवले. एनसीसी मुळेच माझ्यामध्ये शिस्त आली कमांडिंग करण्याची ताकद आली आणि माझ्यातल्या लीडरशिप क्वालिटी डेव्हलप झाल्या. या गोष्टी पैशाने येण्यासारख्या नाहीत. कर्नल समीर पवार व सुभेदार विजय कुमार यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्या शाळेतील रमेश पाटील आणि सौम्या नाझरे या एनसीसी अधिकाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आणि त्यामुळेच मी घडू शकले .आणि जीवनात काहीही करता येणे शक्य आहे फक्त आपल्या मनाची तयारी असायला हवी हा आत्मविश्वास माझ्यामध्ये बळावला. या एनसीसीमुळेच कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मला अॅप्रिसिएशन करणारे पत्र पाठवले. याचा मला अभिमान वाटतो.
*या यशामध्ये तुला आई-वडिलांचा कसा उपयोग झाला?*
मला सांगायला अभिमान वाटतो की, माझी आई ही शिक्षिका आणि माझे वडील हे वकील. या दोघांनीही माझ्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण न आणता मला जे मार्गदर्शन केले त्यामुळे मी तयार होऊ शकले. आईने मला एक गोष्ट माझ्या डोक्यात भरवली होती की रोज शाळेत जे शिकवले जाते त्याची रिविजन रोजच्या रोज केली पाहिजे त्यामुळे लक्षात राहते. म्हणून मी ते रोज करत राहिले. त्याचबरोबर वडिलांनी एक गोष्ट अंगी बानवली ती म्हणजे ‘ तू फक्त अभ्यासात पुढे राहून चालणार नाही तर शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या दोन्हीही स्ट्रॉंग असले पाहिजे . माझे आजोबा यल्लाप्पा नावगेकर हे एक प्रतिष्ठित कष्टाळू शेतकरी .आज वयाच्या 75 व्या वर्षी सुद्धा ते रोज शेतीमध्ये काम करतात. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेतली आणि आपणही जिद्दीने काहीतरी करायचे असे ठरवले. माझ्या घराजवळच असलेल्या VTU च्या ग्राउंडवर मी रोज प्रॅक्टिसला जाते. त्याचा फायदा मला झाला आणि शाळेतील ॲथलेटिक्स मध्ये मी नेहमीच प्रथम राहू शकले. माझ्या वडिलांचे मित्र जे VTU मध्ये जॉबला आहेत ते नारायण अनगोळकर, त्यांचा बंधू संतोष, परशराम चौगुले , त्यांची कन्या अपूर्वा चौगुले, डॉ. पद्मराज पाटील व श्रीकांत जाधव हे नेहमीच आमच्या घरी यायचे. माझी चौकशी करायचे आणि मला कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही हे पाहून माझ्या मनामध्ये काहीतरी नवीन बिंबवायचा प्रयत्न करायचे आणि त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळाली. मी राज्यात प्रथम येण्याचं ध्येय ठेवून अभ्यास केला. त्याची जाणीव मला माझ्या शिक्षकवर्गाने करून दिली होती.
*तू रोज किती वेळ अभ्यास करायचीस?*
-मी रोज पहाटे पाच वाजता उठायची. फ्रेश होऊन सात वाजेपर्यंत अभ्यास करायची. त्यानंतर शाळेला जायची. शाळेतून संध्याकाळी परत आल्यानंतर पुन्हा साडेpपाच ते साडेनऊ या वेळात अभ्यास करायची. त्यामुळे रोज शिकवलेले जे असायचे त्याची रिविजन रोज व्हायची आणि आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, मग जग नेहमी आपल्या पाठीशी राहते हे lमाझ्या मनात बिंबलेले होते त्यामुळे मी अभ्यास करून हे यश मिळवले आहे.
*तनिष्का तू कोणत्या ट्युशनला वगैरे जात होतीस का?*
अजिबात नाही सर, मी आतापर्यंत कुठल्याही एक्स्ट्रा ट्युशनला गेलेले नाही. माझ्या शाळेच्या प्राचार्या जास्मिन रुबडी, मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्याबरोबरच सुनिता कबनूर, सुजाता चव्हाण, सुनिता हुक्केरी, युवराज सरनाईक, अहमद चिकोडी, दीपा तेगिन्मणी व शाळेतील इतर शिक्षक वर्गाने माझ्याकडून जे करून घेतले त्यामुळे मला हे यश मिळाले.
*तुला पुढे काय करायचे आहे?*
मला विज्ञान शाखेला जाऊन पियूसीनंतर वैद्यकीय क्षेत्राकडे जायचे असून डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचा माझा विचार आहे.
*आज विद्यार्थ्यांना तू काय सांगशील?*
सर मी स्वतः मोबाईलचा फारसा उपयोग केला नाही. कधी काही अभ्यासाच्या दृष्टीने गरज भासली तरच मी मोबाईलचा उपयोग करायची. मोबाईल हा एक मायाजाल आहे .त्यामुळे तरुणांनी त्याच्या पाठीमागे न लागता गरजेपुरता मोबाईलचा उपयोग करून अभ्यासाकडे लक्ष दिले तर आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे असे मला वाटते.
यावेळी बोलताना तनिष्काचे वडील शंकर नावगेकर म्हणाले की,लाड सर मी आपल्या गावच्या श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचा माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो . तुमचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. या मार्गदर्शनाचा उपयोग माझ्या कन्येला हे यश मिळवण्यासाठी झाला आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो
*तुझ्या भावी आयुष्याला आमच्या शुभेच्छा! तू स्वतःच्या घराण्याचे नाव उंचावत असतानाच माझ्या मच्छे गावचे नाव उंचावलेले आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही तुझा अनेक ठिकाणी सत्कार करून तरुणांसमोर आदर्श ठेवणार आहे.*