बेळगाव लाईव्ह :भीमगड अभयारण्यातील हेम्माडगा निसर्ग कॅम्पच्या संचालन आणि देखभालीच्या जबाबदाऱ्या जंगल लॉज अँड रिसॉर्ट्स (जेएलआर) यांच्याकडून खानापूर येथील वनविभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू करा, असे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षणाधिकाऱ्यांनी (पीसीसीएफ) बेळगाव सर्कलसाठी असलेल्या मुख्य वनसंरक्षणाधिकाऱ्यांना (सीसीएफ) जारी केले आहेत.
वन्यजीव कार्यकर्ते गिरीधर कुलकर्णी यांनी कर्नाटक वन विभागाचे ब्रिजेश कुमार दीक्षित, पीसीसीएफ (एचओएफएफ), आणि सुभाष मालखेडे, पीसीसीएफ (वन्यजीव) यांना दिलेल्या प्रस्तावानंतर उपरोक्त निर्देश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेम्माडगा निसर्ग कॅम्पच्या संचालन आणि देखभालीच्या जबाबदाऱ्या जंगल लॉज अँड रिसॉर्ट्सकडे सोपवल्यानंतर महसूलात घट आणि कॅम्पमध्ये स्थानिक प्रवेश कमी करणे यासह विविध सबळ कारणे देऊन कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्तावात हस्तांतरणासाठी आग्रह केला होता.
कुलकर्णी यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देत खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही निसर्ग शिबिराचे व्यवस्थापन वनविभागाकडे वर्ग करण्याचे आवाहन वनमंत्री ईश्वर खांड्रे यांना केले होते. यासंदर्भात वनविभागाकडून निर्णय घेण्यास विलंब होत होता. त्यामुळे वनमंत्री खांड्रे यांनी डिसेंबर 2023 मध्ये बेळगाव प्राणिसंग्रहालयाच्या भेटीदरम्यान बेळगाव सर्कलचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी मंजुनाथ चव्हाण यांना तात्काळ हस्तांतरणासाठी शिफारसी सादर करण्याची तोंडी सूचना केली होती.
आता पीसीसीएफ (वन्यजीव) यांनी अधिकृतपणे 11 मार्च 2024 रोजी बेळगाव सर्कलसाठी सीसीएफ यांना हेम्माडगा निसर्ग कॅम्प व्यवस्थापन जेएलआरकडून वन विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार भीमगड अभयारण्यातील हेम्माडगा निसर्ग कॅम्पच्या संचालन आणि देखभालीच्या जबाबदाऱ्या जंगल लॉज अँड रिसॉर्ट्स (जेएलआर) यांच्याकडून खानापूर येथील वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे.