बेळगाव लाईव्ह :तो आमच्या शेजारचा माणूस त्या उमेदवाराचा प्रचार करत होता, तो माझा क्लासमेट पण विरोधात बोलत होता, त्याला बघून घेतो, याला संपवतो, त्याचं बघतो….याला सोडणार नाही, त्याला फोडणार…. अशी वाक्ये सद्या ऐकायला मिळत आहेत.
निवडणूक संपली, उमेदवार आडाखे बांधू लागले. कोणतरी एकटा जिंकणार आणि बाकीचे सगळे हरणार हे साधे गणित आहे. मात्र आता निवडणूक संपली हे मान्य करून सगळ्यांनीच हेवेदावे सोडून आपापल्या कामाला लागण्याची आणि गरजेला पडणारी नाती सांभाळण्याची गरज आहे.
भारत स्वतंत्र झाला आणि आपले सरकार किंवा प्रतिनिधी मंडळ ठरवण्याची जबाबदारी लोकशाहीने जनतेला दिली. राजकीय पक्ष आपापल्या मत प्रवाह आणि विचारांनी व्यक्त होऊ लागले. ज्यांचे विचार पटतील त्याप्रमाणे जनता मतातून व्यक्त होऊ लागली. सरकारे घडू लागली. तगली, पडली, बदलली, सत्तांतर झाले…. पुन्हा पुन्हा असेच होत राहील.
मला जो पक्ष आवडतो तो माझ्या मित्र, शेजारी आणि संपूर्ण कुटुंब किंवा समाजाला आवडेल असे नसते. याचे भान मात्र सद्याच्या काळात हरवले जात असल्याचे जाणवते. हेकेखोर पणा वाढला की सुरू होतो परस्पर विरोध आणि त्यानंतर निर्माण होतात मतभेद. इतर कारणे आणि वैचारिक संघर्ष वेगळे, निवडणूक आणि राजकारणातून निर्माण होणारे संघर्ष मात्र त्याचवेळी सोडून देऊन आपापल्या कामाकडे लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे.
निवडणुकीत जो निवडून आला तो सत्तेच्या नियोजनात लागेल. हारलेला पुन्हा येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागेल, राजकीय संन्यास घेऊन आपल्या कामाला लागेल किंवा निवडून आलेल्याला पाच पुढील पाच वर्षे विरोध करीत राहील. या दोघांच्याही दृष्टीने आपण कुठेच नसू. आपण मात्र आपला जिंकला म्हणून आनंदात किंवा आपला हारला च्या दुःखात राहताना आपले सगे, सोयरे, मित्र, शेजारी यांच्याकडे बघताना दात, ओठ खात राहणार. असे करण्यापेक्षा आता हा सिझन संपला असे म्हणून एकमेकाशी वैर संपवून एकत्र आलो तरच सर्वकाही शांत राहील. अन्यथा निवडणूक लढणारे नामानिराळे आणि आमच्या डोक्यात राख असेच चित्र राहणार.
आपल्या कामाला आपल्या हाकेला लगेच ओ देणाऱ्या व्यक्तींशी दुरावा करून काय मिळणार? याचा विचार करायला हवा. अडचणीच्या वेळेला निवडणुकीत जिंकणारे कधीच येऊ शकत नाही. कारण ते शक्यही नसते. ते आपल्या कामात असतात. आणि जे लवकर पळून येऊ शकतात त्यांच्याशी आपले वैर असते. याचा विचार केला तर आपण सर्वजण राजकारणाच्या पलीकडील सामाजिक सलोखा जपू शकतो.
यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा आदर्श घ्यायची गरज आहे. राजकारणापुरते कट्टर वैरत्व आणि त्यानंतर आतून गोड संबंध जपण्याची परंपरा सर्वच नेत्यांनी जपली आहे. अनेकांचे रोटी बेटीचे व्यवहार आहेत. एकत्रित जागा जमिनी आहेत. आम्ही हे शिकायला पाहिजे. निवडणुकीत विरोधात होत्ता, त्याच्या मातीस बी जाणार न्हाय म्हणत डोळ्यात अंगार घेऊन जगण्यात शहाणपणा नाही.
राजकीय पुढारी एकमेकाला संपवण्याची भाषा करतात, गरज पडली की त्यांच्यात सेटलमेंट होतात. त्यांच्यासाठी एकमेकांची डोकी फोडून घेणारे कार्यकर्ते वाऱ्यावर असे व्हायचे नसेल तर आता निवडणूक फिवर मधून माणसात येण्याची खरी गरज आहे.
या निवडणुकीनंतर देशाचे भवितव्य ठरणार असे सगळ्याच पक्षांनी सांगितले आहे. त्यापैकी कोणता तरी एक पक्ष स्वबळावर निवडून यावा आणि देशाचे भवितव्य उज्वल व्हावे हा सकारात्मक विचार करून आपण आपल्या कामाला मोकळे व्हावे लागेल. किती जणांना हा विचार पटेल हे माहीत नाही. पटलं ते हो म्हणा नाहीतर चुकलं म्हणा, मात्र आपलेही विचार कळवा ही विनंती.
प्रसाद सू प्रभू(जेष्ठ पत्रकार बेळगाव)