बेळगाव लाईव्ह : गेल्या २ वर्षात बिबट्यामुळे उजेडात आलेला अरगन तलाव परिसर अंधारात सापडला आहे! गेल्या कित्येक महिन्यांपासून या भागात पथदीप नसल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा मार्गापासून क्लब रोड मार्गे तसेच यंदे खूट मार्गे गांधी चौक आणि कॅम्प परिसरातून येणारी अवजड वाहने गांधी चौकातून अरगन तलाव, हिंडलगा गणपती मंदिरामागे तसेच बॉक्साइट रोड मार्गे महामार्गाच्या दिशेने जाणारी वाहने याच परिसरातून मार्गस्थ होतात.
गेल्या कित्येक महिन्यांपासून या मार्गावर पथदीपांची सोय नसल्याचे निदर्शनात येत असून हा संपूर्ण परिसर अंधारमय झाला आहे. हा परिसर छावणी परिषदेच्या अखत्यारीत येतो. मात्र या समस्येकडे छावणी परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
अरगन तलाव परिसरात असणाऱ्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. अंधार, आखूड रस्ता आणि त्यातच खड्ड्यांची भर यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. काही दिवसातच शाळांना प्रारंभ होईल. तथापि या मार्गावरून हिंडलगा मार्गे शहराच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.
याच भागात असणाऱ्या हिंडलगा गणपती मंदिरात असंख्य भाविक दिवसासह रात्रीही दर्शनासाठी येतात. परंतु सातत्याने अंधारमय असलेल्या या भागाकडे छावणी परिषदेने लक्ष न पुरविल्याने नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वाहने चालविणे धोक्याचे ठरत असून दुचाकीस्वारांना याचा अधिक फटका बसत आहे.
याच परिसरात मागील दीड दोन वर्षात बिबट्याचे दर्शन घडले होते. याभागात पसरलेले गोल्फ मैदान आणि दाट झाडी यामुळे वन्यप्राण्यांचा वावरदेखील या भागात अधिक असण्याची शक्यता आहे. अशावेळी नागरिकांच्या जीवावर या गोष्टी बेतू शकतात. यामुळे छावणी परिषदेने तातडीने या भागातील अंधार दूर करून पथदीपांची सोय करावी, अशी मागणी पुढे येत आहे.