बेळगाव लाईव्ह : मागील विधानसभा निवडणुकांपासून जिल्ह्यात जादूटोण्याचे प्रकार वाढल्याचे चित्र आहे. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जादूटोण्याचे प्रकार दिसून आले होते. आता चक्क हे पेव जिल्ह्यात येऊन पोहोचले असून न्यायालयाच्या आवारात जादूटोण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तहसीलदार कार्यालयात देखील जादूटोण्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर पुन्हा आज न्यायालयाच्या आवारात हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून दिवसभरात या प्रकारची कुतूहलाने चर्चा होत होती.
गेल्या अनेक दिवसांपासून बेळगाव आणि परिसरात विक्षिप्त असे जादूटोण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. विरोधी पक्षातील उमेदवार, आपापसात धुमसत आलेल्या प्रकरणी एकमेकांच्या घरासमोर लिंबू, उतारा टाकणे असेही प्रकार गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले. मात्र आता या प्रकारांनी चक्क सरकारी कार्यालयांचे उंबरठे गाठले असून या प्रकारामुळे आश्चर्य तर व्यक्त होतच आहे,
शिवाय या प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? जादूटोण्यासारखे प्रकार का घडविण्यात येत आहेत? असे प्रकार करून कुणाला काय साध्य करायचे आहे? असे प्रश्नदेखील उपस्थित होत आहेत.
बेळगाव न्यायालयासमोर सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे या भागातून जा – ये करणारे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे आढळून आहे. जादूटोण्याच्या या प्रकारात गुलालाने माखलेला नारळ, हळदी, कुंकू यासह अनेक साहित्य होते. हा प्रकार पाहताक्षणीच काही जणांनी भीती व्यक्त केली.
जिल्हा न्यायालयाचा आवार हा सीसीटीव्हीयुक्त आहे. मात्र केवळ काही भागापुरते मर्यादित सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने या प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? असे प्रकार घडवून जनतेमध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे कि आणखी दुसराच कोणता हेतू आहे? हे स्पष्ट होण्यास मार्ग नाही.
न्यालयाय आवारात वकिलांसह सर्वसामान्य नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या विरोधात कठोर नियम करण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे. तहसीलदार कार्यालयापाठोपाठ आणखी एका सरकारी कार्यालयाच्या आसपास असा प्रकार घडल्याने याबाबतीत जिल्हा प्रशासन कोणते पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.