Monday, January 27, 2025

/

तहसीलदार कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा वावर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भटक्या कुत्र्यांचा वावर सर्वत्र वाढला असून आता बेळगाव मनपाच्या जुन्या इमारतीत म्हणजेच तहसीलदार कार्यालयात देखील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना शासकीय कार्यालयात देखील अशापद्धतीने भटकी कुत्री आढळून आल्याने मनपाच्या एकंदर कार्यशैलीवर नागरिक शंका उपस्थित करताना दिसत आहेत.

शहर परिसरातील बहुतांशी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहराच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगाशेजारी अधिकाधिक कुत्र्यांचा वावर आढळून येत आहे. रात्रीअपरात्रीसह आता दिवसाढवळ्याही कुत्र्यांचा उपद्रव नागरिकांना सोसावा लागत असून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलेही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शहरातील विविध ठिकाणच्या रस्तोरस्ती ठाण मांडून बसलेल्या कुत्र्यांची टोळी अचानकपणे दुचाकीवरून जाणाऱ्यांच्या भुंकत मागे लागते, शिवाय पादचारीही कुत्र्यांच्या तडाख्यात सापडत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत अलीकडेच झालेल्या मनपा बैठकीत नगरसेवकांनी मुद्दा मांडत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही केली होती. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून शस्त्रक्रिया करावी, अशी सूचना करण्यात येऊनही मध्यंतरी हाती घेण्यात आलेली श्वान नसबंदी मोहीम थंडावल्याचे जाणवत आहे.Tahsildar

 belgaum

भटक्या कुत्र्यांचा केवळ शहरातील नागरिकानाच उपद्रव होत आहे असे नाही तर शहरात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे. मात्र याकडे मनपा प्रशासन किंचितही लक्ष देताना दिसत नसून मनपाच्या या कारभाराबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

शहरातील रस्त्यांपाठोपाठ चक्क शासकीय कार्यालयातच ठाण मांडून बसलेल्या भटक्या कुत्र्यांनी शासकीय यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.