Tuesday, April 30, 2024

/

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित : जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : निवडणुकीच्या निकालानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. बेळगावच्या ग्रामीण मतदार संघातून २५ हजारांचे मताधिक्य घेऊन जगदीश शेट्टर दोन ते अडीच लाख मतांनी विजय मिळतील असा विश्वास माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. आज बेळगाव ग्रामीण मतदार संघात आयोजिण्यात आलेल्या बूथस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.

रमेश जारकीहोळी यांच्या राजकीय वैरी समजल्या जाणार्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या ग्रामीण मतदार संघात हे अधिवेशन आयोजिण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिनचे सरकार येणार असून बेंगळुरू आणि चेन्नईच्या मॉडेलवर इंडस्ट्री कॉरिडॉर बनविण्याचा भाजपचा उद्देश आहे.

केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर दोन्ही बाजूंनी विकास करू. निवडणुकीनंतर राज्यातील सरकार कोसळणार आहे, काँग्रेसने दिलेल्या हमी योजनांवर विश्वास ठेवू नका, निवडणुका झाल्यानंतर मोफत बस, मोफत वीजबिल, गृहलक्ष्मी या सर्व योजना बंद होतील असा दावाही रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.

 belgaum

भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले की, भाजपाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे. यामुळे काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे. आमचे नेते मोदी आहेत हे आम्हाला माहीत आहे परंतु काँग्रेसला त्यांचे नेतृत्वच माहीत नाही. काँग्रेसला राहुल गांधींचे नेतृत्व मान्य नाही. काँग्रेसला घरी बसविण्यासाठी मोदींची जबाबदारी आता वाढली असून देशात ४०० जागा मिळविल्यानंतर पाकव्याप्त काश्मिरदेखील परत मिळेल, असा विश्वास जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.

बेळगावच्या विकासासाठी सुरेश अंगडी यांच्यामवेत एकत्रित काम केले असून या भागाच्या विकासासाठी विधानसभेत आवाजदेखील उठविला आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघ आदर्श बनविण्याचा आपला संकल्प असून भाजपाची बेळगावची जागा विजयी करून मोदींच्या पंतप्रधानपदाला अधिक सक्षम करा, असे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले. राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकारकडून देण्यात येत असणाऱ्या हमी योजना हि धोक्याची घंटा आहे. निवडणुकीनंतर या सरकारचे काय होईल हे सांगता येत नाही. यामुळे भाजपाला अधिकाधिक मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार अनिल बेनके यांनी आपले विचार व्यक्त करताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाने जातीचे विष पेरून समाजात फूट पाडण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे.पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनाच निवडून देण्याचा निर्णय संपूर्ण देशातील जनतेने घेतला असून भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

या अधिवेशनात अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर, खासदार मंगला अंगडी, ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव, आमदार रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, चिक्क रेवण्णा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.