Tuesday, April 30, 2024

/

माजी आमदारांचा गेला तोल! रात्रीच्या मेजवानीमुळे घसरली जीभ…!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हल्ली राजकारणाचा दर्जा अत्यंत हीन पातळीवर घसरला आहे. संसदेपासून गल्लीतल्या मंडळांपर्यंत सुरु असलेल्या राजकारणात अनेकांची जीभ अचानक घसरते हे कित्येकवेळा दिसून येत आहे.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा फिव्हर आहे. निवडणुका म्हटलं कि आरोप – प्रत्यारोप आले. राजकारणाचा मूळ पिंड मुळातच आरोप – प्रत्यारोपांवरून सुरु होतो. मात्र समाजाचे प्रतिबिंब दर्शविणाऱ्या राजकारण्यांकडून अलीकडच्या काळात राजकारणाचा दर्जा अत्यंत हीन पातळीवर नेऊन ठेवण्यात आला आहे.

बेळगावमध्ये अशाच हीन पातळीवरच्या राजकीय भाषणाची चर्चा शनिवारी दिवसभर रंगली होती. एका माजी आमदारांना विद्यमान महिला आमदारांवर टीका करताना आपल्या जिभेचा तोल सावरता आला नाही, हेच त्यांच्या भाषणातून जाणवले. जिजाऊ, भगवा, हिंदू यासारख्या मुद्द्यांच्या आडून बोलताना एका माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना चक्क पायताण काढून दाखवा असे अप्रत्यक्षरिता उपस्थित जनतेला सांगितले. महिला आमदारांवर वैयक्तिक पातळीवर असभ्य पद्धतीने टीका केली.

 belgaum

शब्दांचा तोल ढासळला.. आणि शनिवारी हा विषय चर्चेचा ठरला.. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असणाऱ्या माजी आमदारांना रात्रीची ‘सोमरसा’ची मेजवानी जड झाल्याने जिभेचा तोल सावरता आला नाही अशा प्रत्त्युत्तरादाखल सडकून टीका जनतेतून करण्यात आल्या.

भारतीय संविधानाने तसेच भारतीय संस्कृतीने महिलांना आदराचे स्थान दिले आहे. परंतु एका जबाबदार व्यक्तीने एका महिला लोकप्रतिधीवर अशापद्धतीने खालच्या स्तराला जाऊन टीका करणे, जाहीर व्यासपीठावरून तोंडाला येईल ते बरळणे हे माजी लोकप्रतिनिधी म्हणून अशोभनीय तर आहेच. शिवाय अशापद्धतीची भाषा जनतेत वापरणे कितपत योग्य आहे हा प्रश्न राजकारण्यांनी पडताळून पाहणे गरजेचे आहे.

राजकारण हे क्षेत्रच असे आहे जिथे विरोधकांवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही. आजवर अनेक मातब्बर, ज्येष्ठ आणि दिग्गज नेते राजकारणात येऊन गेले. परंतु विरोधकांवर टीका करताना आपला संयम शाबूत ठेवून सक्षम आणि दर्जात्मक टीका केली जायची. संसदेत सत्ताधारी आणि विरोधात होणाऱ्या टीका या जनतेलाही रुचायच्या. मात्र अलीकडे राजकारणी मंडळी कोणतीच मर्यादा, स्तर न जपता ज्यापद्धतीने टीका करत आहेत, हे निंदनीय आहे.

बेळगावमधील राष्ट्रीय पक्षाच्या झालेल्या बूथस्तरीय अधिवेशनात झालेला प्रकार देखील अशाचपद्धतीचा आहे. एका माजी आमदारांनी लाजिरवाण्या पद्धतीने एका महिला आमदारावर टीका करणे, राजकारण सोडून वैयक्तिक पातळीवर एकेरीत उल्लेख करणे हि बाब अत्यंत अशोभनीय आहे. विकास, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासारखे अनेक विषय राजकीय व्यासपीठावरून चर्चा करण्यासारखे आहेत.

परंतु सभ्यता, सुसंस्कृतपणा विसरून अशापद्धतीने केली गेलेली टीका हि बेळगावकरांच्या पचनी पडणार नाही. विरोधक कुणीही असो.. राजकारणाचा आणि आपल्या पदाचा ‘दर्जा’ घसरणार नाही याची काळजी प्रत्येक राजकारण्यांनी घेणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.