बेळगाव लाईव्ह :बेळगाव लायन्स, लायन्स ऑफ टिळकवाडी, बेळगाव मेन, मिडटाऊन आणि खानापूर यांनी हाती घेतलेला कोंडप्पा स्ट्रीट कॅम्प, बेळगाव येथील खुल्या मृत विहिरीच्या पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीरित्या पार करण्यात आला असून त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
पुनरुज्जीवीत करण्यात आलेल्या सदर विहिरीचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार आणि लायन्स चे जिल्हा प्रांतपाल ला. एर्ले ब्रिट्टो उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विहिरीचे उद्घाटन झाले. सदर प्रकल्प म्हणजे आपला वारसा जतन करण्यासाठी आणि सामुदायिक भावनेला चालना देण्यासाठी लायन्स क्लब करिता एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.
विहीर पुनरुज्जीवित करण्याचा हा उपक्रम 1952 मध्ये स्वातंत्र्यानंतर विहिरींच्या खुदाईद्वारे पाणी टंचाईच्या काळात स्थानिक समुदायासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित केली जात होती त्याची आठवण करून देणारा आहे. कोंडप्पा स्ट्रीट कॅम्प येधील ही विहीर जवळपास 35 वर्षांपासून मृतावस्थेत आणि अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होती.
मात्र आता महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता आर. एस. नायक आणि किरण निपाणीकर यांच्या पुढाकाराने आणि लायन्स क्लबच्या सहकार्याने तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प घेतल्याबद्दल स्थानिक लायन क्लबच्या सर्व सदस्यांचे तसेच अरविंद सांगोली, ल. न. मल्हारी, ल. न. टापळे, कॅन्टोन्मेंटचे अभियंता सतीश मन्नूरकर यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
पुनरुज्जीवीत विहिरीच्या उद्घाटनाप्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य आणि स्थानिक रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते. अधिकाधिक संस्थांनी शहर आणि परिसरातील पाण्याच्या संकटाशी लढण्यासाठी असाच पुढाकार घ्यावा, जेणेकरुन बेळगावीलाच पुरेसे पाणी मिळेल, असे आवाहन किरण निपाणीकर यांनी केले आहे.