Monday, June 17, 2024

/

गॅरंटी योजनेचा जनतेला लाभ : प्रियांका जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या समर्थकांसमवेत देवगिरी, गुंजेनहट्टी व कडोली या गावांमध्ये झंझावती प्रचार दौरा केला. यावेळी प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या देवगिरीपासून झाली. तेथून त्यांनी गुंजेनहट्टी, कडोली वगैरे गावांचा प्रचार दौरा केला. यावेळी प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून पाठिंबा व्यक्त केला. प्रचार दौऱ्याचे औचित्य साधून कडोली येथे प्रियांका यांच्या उपस्थितीत धनगर समाज बांधवांच्या मंदिराचा वास्तुशांती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वास्तुशांती व कळसारोहण कार्यक्रम स्वामीजींच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

त्यानंतर आयोजकांतर्फे प्रियांका यांचा कुरबुरांची घोंगडी, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस नेते मलगौडा पाटील, अरुण कटांबळे, समाजसेविका रंजीता आदी उपस्थित होते. कार्यक्रमास धनगर बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

 belgaum

गुंजेनहट्टी येथे देखील उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचे उत्साही स्वागत करून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी देखील प्रियांका यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी आपल्या भाषणात आपण गेल्या चार-पाच वर्षापासून समाजकार्य करत असून युवा पिढीच्या उत्कर्षासाठी झटत असल्याचे सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या फाउंडेशनतर्फे राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, आरोग्य तपासणी, हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत वगैरे आपल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच गावातील समस्या सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधावा आणि माझ्या वडिलांनी या भागात अनेक विकास कामे केली आहे आता तशी कामे करण्याची संधी मलाही द्यावी. त्यासाठी मला तुमच्या मतांच्या स्वरूपात आशीर्वाद देऊन या मतदारसंघातून बहुमताने विजयी करावे, असे आवाहन प्रियांका यांनी केले.Priyanka j

यावेळी बोलताना बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी मंत्री असण्याबरोबरच सतीश जारकीहोळी हे आपल्यासाठी एक आदर्श सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांची मुलगी प्रियांका हिच्या प्रचारासाठी आपण येथे आलो आहोत असे सांगितले. तसेच जारकीहोळी यांच्या जनहितार्थ कार्याची माहिती दिली. प्रियांका देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटतील असा मला विश्वास आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्वांनी त्यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन करून मुळगुंद यांनी उपस्थितांना प्रियांका जारकीहोळी यांनाच मतदान करू अशी शपथ देवविली. आजच्या प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचार दौऱ्यात स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.

आपल्या प्रचार दौऱ्यादरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या की, काँग्रेस हायकमांडने मला उमेदवारी बहाल करून संधी दिली याचा मला खूप आनंद आहे. या संधीचे सोने करण्यासाठी माझे वडील, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि स्थानिक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवत आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजनांमुळे जनतेचे भले होत आहे.

त्याचप्रमाणे माझ्या वडिलांनी यमकनमर्डी मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात भरीव विकास कामे केली आहेत. त्याच्या जोरावर मी ही निवडणूक लढवत आहे. वडिलांप्रमाणेच उत्तम काम करण्याची माझीही इच्छा आहे आणि निवडणुकीत विजयी करून मतदार बंधूभगिनी मला तशी संधी देतील अशी अपेक्षा आहे, असे प्रियांका म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.