बेळगाव लाईव्ह : विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यादेखील मूळच्या बेळगावच्या नसून त्या खानापूर मतदार संघातून आहेत. त्यामुळे आधी तुमचा पत्ता सांगा अशा शब्दात भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना टोला लगावला आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर विरुद्ध विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर हे निवडणूक लढवत आहेत. अप्रत्यक्षरीत्या ही निवडणूक लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या ताकदीवरच लढविली जाणार असून याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पातळीवर घमासान सुरु झाले आहे.
जगदीश शेट्टर हे मूळचे बेळगावचे नाहीत. त्यामुळे भाजपसह सर्वसामान्य जनतेतूनही जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीवरून म्हणावी तितके समाधान व्यक्त होत नाही. हीच बाब हेरून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकरांनी त्यांच्यावर टिप्पणी केली. जगदीश शेट्टर यांचा पत्ता शोधावा लागेल, अशा शब्दात टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर यादेखील मूळच्या बेळगावच्या नसून त्या खानापूर मतदार संघातील आहेत. त्यांनी जगदीश शेट्टर यांच्यावर टीका केली. पण हेब्बाळकरांनी आधी स्वतःचा स्थानिक पत्ता सांगावा, आपण कुठून आलो हे सांगावे, आपले गाव कॅनरा लोकसभा मतदार संघात आहे, त्यामुळे तुम्हीदेखील परगावच्याच आहात, अशी टीका करत भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी, काँग्रेसमध्ये इतके चांगले कार्यकर्ते असूनही तुमच्याच कुटुंबाला उमेदवारी कशी दिली? असा टोला लागवणारा सवालही केला.