बेळगाव लाईव्ह : शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधपणे चालवण्यात येत असलेल्या हुक्का बारवर बेळगाव पोलिसांनी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली असून विविध कंपन्यांचे २,५६,६०० रुपयांचे हुक्का व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
राज्यात हुक्का बारवर बंदी असूनही केंद्र सरकारने बंदी घातलेल्या हुक्का आणि तंबाखूजन्य पदार्थांचे घटक अज्ञात ठिकाणाहून आणून कोणत्याही परवान्याशिवाय ग्राहकांना विकले जात असल्याची माहिती बेळगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती, मार्केट आणि टिळकवाडी पोलिसांनी हुक्का बारच्या दुकानावर छापे टाकले. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
छाप्यादरम्यान ७५ ,५०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे १२६ हुक्के, ६२ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ५१ रोल पेपर, १५ ,५०० रुपये किमतीचे ३० विविध कंपन्यांचे चारकोल, २०,३०० रुपये किमतीच्या विविध कंपन्यांचे १२० बोँग पाईप, ४१,५०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांची विदेशी सिगारेटची २५ पाकिटे. २५ ,३०० रुपये किमतीची विविध कंपन्यांची तंबाखूची पाकिटे, १६,५०० रु. किमतीच्या विविध कंपन्यांच्या फ्लेवर्स सिगारेट असे एकूण २,५६,६०० रुपये किमतीचे हुक्का साहित्य जप्त करण्यात आले. या संदर्भात आरोपी अबुबकर जैनब सिद्दीक (वय ३१ ) आणि शाबाज शकील अहमद (वय २२ , रा. मूळ मंगळुर, सध्या अनगोळ) यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एसीपी सदाशिव कट्टीमणी, सीपीआय कपिलदेव व सहकाऱ्यांनी भाग घेतला.
याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना डीसीपी रोहन जगदीश म्हणाले की, काल बेळगाव पोलिसांची ३ पथके तयार करून ३ ठिकाणच्या अवैध हुक्का बारवर छापे टाकण्यात आले. त्यात माळमारुती पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हापूर सर्कलमधील युनिक शॉप आणि टिळकवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील द स्मोक शॉप व आणखी एका हुक्का बारवर छापे टाकण्यात आले. याठिकाणी अवैधरित्या परदेशी सिगारेट्स आणि नशा आणणाऱ्या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन होत होते. यापूर्वी, सरकारने अंमली पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली असूनही अवैधरित्या हुक्का बार चालविण्यात येत होते.
त्यांच्यावरील छाप्यात १२६ हुक्के, विविध कंपन्यांचे ५१ रोल पेपर, ३० वेगवेगळ्या कंपनीचे चारकोल, विविध कंपन्यांचे १२० बोँग पाईप, विदेशी सिगारेटची पाकिटे, विविध कंपन्यांची तंबाखूची पाकिटे असा एकूण २,५६,६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे सीपीआय कपिलदेव ए. एच., पीएसआय के. पी. चंदावरकर यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.