बेळगाव लाईव्ह:’बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांची महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांनी घेतली दखल आहे.बेळगावच्या मराठी जनतेचा आवाज बनलेल्या ‘बेळगाव लाईव्ह’ पोर्टलचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
बेळगावकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल पोर्टल आजतागायत मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच लढत आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून संपादक प्रकाश बेळगोजी यांनी पत्रकारिता क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली आहे. प्रकाश बेळगोजी यांच्या पत्रकारितेची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आपल्या सक्षम लेखणीच्या माध्यमातून सीमावर्ती भागात मराठी अस्मितेचा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी प्रकाश बेळगोजी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्नशील असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमाभागात सुरु असलेली असलेली निर्भिड पत्रकारिता स्फूर्तिदायी असून त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. 16 मार्च 2024 रोजी चिंचवड येथील आहेर गार्डन (ए. सी. बैंक्वेट हॉल, चिंचवड) येथे पार पडणार आहे. या वेळी एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. या प्रसंगी केंद्रीय वित्तराज्यमंत्री भागवत कराड आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
शनिवार, दि. 16 मार्च 2024 रोजी चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे एकदिवसीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत त्यावेळी अमृत काळातील माध्यम स्वातंत्र्य भविष्य आणि पत्रकारितेतील राम या विषयावर लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव,लोकमत डिजिटलचे संपादक संजय आवटे, टाइम्स ना मराठीचे संपादक मंदार फणसे,जेष्ठ संपादक महेश म्हात्रे, सकाळचे संपादक सम्राट फडणवीस जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध स्तरावरील घटनांचा वेगवान आणि अचूक आढावा घेत सीमाभागातील मराठी भाषिकांची बाजू उचलून धरण्यात प्रकाश बेळगोजी यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१७ साली ‘बेळगाव लाईव्ह’ या नावाने छोट्या स्वरूपात सुरु केलेले पोर्टल आज लाखो फॉलोवर्स जोडत बेळगावकरांच्या लाडक्या माध्यमात रूपांतरित झाले आहे, आणि हे प्रकाश बेळगोजी यांनी साध्य केले आहे. स्थानिक घडामोडी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांचे अचूक आणि वेगवान वृत्तांकन करणारे हे पोर्टल बेळगावकरांसह देशविदेशात देखील प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मराठी माणसाच्या बुलंद आवाजाचे कणखर प्रतिनिधित्व करणारे हे पोर्टल प्रकाश बेळगोजी यांनी लीलया पेलले आहे. पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येक घडामोडीचा अचूक अंदाज घेत बातमीचा पैलू उलगडणे आणि सत्य परिस्थिती वाचकांसमोर मांडण्याचे काम ‘बेळगाव लाइव्ह’च्या माध्यमातून प्रकाश बेळगोजी यांनी सुरु ठेवले आहे. त्यांच्या याच वार्तांकनाच्या पद्धतीमुळे आज ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल न्यूज चॅनेलच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. १ लाखाहून अधिक फॉलोवर्स असणाऱ्या बेळगाव लाइव्हच्या माध्यमातून आजवर प्रकाश बेळगोजी यांनी अन्यायाला वाचा फोडत, कर्नाटक सरकारची दडपशाही झुगारून मराठी माणसाच्या हक्कासाठी अजेंडा राबविला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात उतरल्यापासून ते आजतागायत त्यांनी सीमाप्रश्न, बेळगावच्या मराठी माणसांचा आवाज महाराष्ट्रासह केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ असो किंवा मराठी माणसासाठी पुढाकार घेऊन करण्याचे कोणतेही काम असो, कोणत्याही क्षणी एका हाकेवर मराठी माणसाची बाजू उचलून धरण्याचे कार्य आजवर प्रकाश बेळगोजी यांनी केले आहे. बेळगावच्या राजकारणात राजकारणी आणि नेत्यांप्रमाणेच प्रकाश बेळगोजी यांच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या वृत्तांकनालादेखील प्राधान्य दिले जाते, हे विशेष.