बेळगाव लाईव्ह :एसएसएलसी परीक्षेला उद्या सोमवार 25 मार्चपासून प्रारंभ होत असून उद्या रंगपंचमी सण असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे यासाठी कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने वाहनांची मोफत सोय करण्यात आली आहे.
उद्या सोमवारी रंगपंचमी दिवशी सुरू होणाऱ्या एसएसएलसी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता यावे या दृष्टिकोनातून कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने मोटार कार गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
उद्या सोमवारी 25 रोजी व शनिवार दि. 30 मार्च 2024 रोजी बॅरिस्टर नाथ पै चौक, शहापूर येथे सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व वेळेवर परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालोजी अष्टेकर, उपाध्यक्ष नेताजी जाधव आणि श्रीधर (बापू) जाधव यांनी केले आहे. त्याचप्रमाणे पालक व विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षा केंद्रात पोहोचण्याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनीही विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अंगावर रंग फेकू नये, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.