बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र सरकारच्या योजना सीमावासियांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिनोळी येथे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सीमावासीयांना महाराष्ट्र सरकारने पुरविलेल्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. सीमाभागाचे समन्वयाधिकारी म्हणून काम पाहणारे गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी नोडल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे पत्र पाठविले आहे.
सीमाभागातील मराठी भाषिक जनतेचे विविध योजनांसंदर्भातील अर्ज, निवेदने स्वीकारणे, प्रामुख्याने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अर्ज स्वीकारणे, शिवाजी विद्यापीठ तसेच सीमाभागातील विद्यार्थ्यांकरिता वैद्यकीय व इंजिनियरिंग महाविद्यालयांमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या जागा यासंदर्भातील माहिती प्राप्त करून घेणे,
कर्नाटक – महाराष्ट्र सीमालढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न सोडविणे, महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जातील लाभार्थींना, रुग्णांना तात्काळ लाभ मिळण्यासाठी सदरचे अर्ज, त्यासोबतची कागदपत्रे स्कॅन करून मुख्यमंत्री सहाय्यता कक्षा यांचेकडे तात्काळ पाठविणे, तसेच ते सर्व प्रस्ताव स्पीड पोस्टने मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे पाठविणे आदी कामांसाठी विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
यामध्ये चंदगडचे महसूल नायब तहसीलदार तथा नोडल अधिकारी म्हणून अशोक पाटील हे काम पाहणार आहेत. तर सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून तुर्केवाडी मंडळ अधिकारी बाळासाहेब सरगर, तुडये कनिष्ठ प्राथमिक आरोग्य सहाय्यक केंद्राचे सौरभ देसाई, माणगाव कनिष्ठ प्राथमिक आरोग्य सहाय्यक केंद्राचे हणमंत लेभे, तुडिये प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी प्रभाकर कुलकर्णी, शिनोळी तलाठी प्रल्हाद खटावकर काम पाहणार आहेत.
नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेले कामकाज नियमातील तरतुदीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय शिनोळी येथून करावे, कामकाजात आणि कर्तव्यात कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.