Thursday, May 2, 2024

/

तब्बल 150 वर्षानंतर येळ्ळूर मराठी शाळेला मिळणार मैदान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील तब्बल 150 वर्षे मैदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी मराठी उच्च प्राथमिक माॅडेल शाळेसाठी अखेर मैदानासाठी जागा मंजूर झाली असून या जागेचे मैदानात परिवर्तन करण्याच्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

सरकारी मराठी उच्च प्राथमिक माॅडेल शाळा येळ्ळूर शाळेची स्थापना सन् 1874 साली झाली आणि त्याला यावर्षी बरोबर 2024 दीडशे वर्षे पूर्ण होतात. इतकी वर्षे होऊनही शाळेला आजपर्यंत स्वतःचे क्रीडांगण नव्हते. सध्या शाळेची परिस्थिती पाहता शाळा भौतिक रूपाने गुणवत्तेने अगदी समृद्ध आहे.

तथापि विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टिकोनातून शाळेला क्रीडांगण असणे ही फार अत्यंत गरजेचे होते. हे लक्षात येताच गेल्या अनेक वर्षांपासून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, एस.डी.एम.सी., माजी विद्यार्थी यांनी शाळेला क्रीडांगण मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. त्या प्रयत्नांना आज अखेर यश आले आहे.

 belgaum

मैदानासाठी येळ्ळूर ग्रामपंचायतकडे यासंदर्भात वारंवार निवेदने सादर केल्यानंतर ग्रामपंचायतीने शाळेसाठी गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गायरान जागे पैकी 2 एकर जमीन शाळेला मैदान तयार करण्यासाठी मंजूर केले. हे होत असतानाच योगायोगाने भीमा कोरेगाव स्तंभाच्या उद्घाटनासाठी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी येळ्ळूरला भेट दिली.

याचे औचित्य साधून शाळेच्या शिक्षकांनी आणि एस.डी.एम.सी. सदस्यांनी त्यांना मैदानाच्या विकासासाठी निधी मंजूर करावा म्हणून निवेदन दिले. पालकमंत्री जारकीहोळी यांनीही विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाचा विचार करून योग्य निधी त्वरित मंजूर केला.

सदर मैदानाच्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ गेल्या शनिवारी दुपारी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप एम. जे., बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष परशराम ढगे, बेळगाव ग्रामीणचे अध्यक्ष किरण आण्णा पाटील, ग्रा. पं. सदस्य सतिश बा. पाटील यांच्यासह नेते बसवराज शेगावी, अनंतकुमार बेकवाड, पांडुआण्णा दोडण्णवर, माजी नगरसेवक भैरगौडा पाटील, मारीहाळ ग्रा.पं.उपाध्यक्ष असिफ मुल्ला, येळ्ळूर ग्रा. पं. पी.डी.ओ., उपाध्यक्ष प्रमोद पाटील व सर्व ग्रा. पं. सदस्य उपस्थितीत होते. उपस्थितांचे शाल, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य सतिश पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी बोलतांना सतीश पाटील यांनी परिसरातील नागरिक आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने सदर मैदानाचा विकास केला जाणार असल्याचे सांगितले. हे मैदान गावच्या मध्यभागी असल्यामुळे याचा उपयोग शाळेसह गावातील शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक तसेच धार्मिक अशा विविध कार्यक्रमांसाठी होऊ शकतो असे सांगून यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य फार मोलाचे आहे आणि ते लाभणारच आहे. गावाच्या विकासासाठी यापुढेही निःस्वार्थ भावनेने सतत कार्यरत असणे हे एक सुजाण नागरीक म्हणून मी माझे कर्तव्य समजतो, असे सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.Yellur

ग्रा.पं. उपाध्यक्ष श्री प्रमोद पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मैदान उपलब्ध झाले याचे आम्हाला समाधान लाभले असे सांगून शाळेने भविष्यात चांगले खेळाडू निर्माण करावेत अशा शुभेच्छा दिल्या.

गेली कित्येक वर्षे शाळेचे माजी विद्यार्थी, येळ्ळूर ग्रा पं. माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य, शिक्षण व क्रीडाप्रेमी तसेच समाज सुधारक सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या शाळेला मैदानासाठी जागा मिळून देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. ते दिवसरात्र या कामासाठी झटत होते. आता त्यांनी मैदानाच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यांच्या सततच्या निःस्वार्थ प्रयत्नांमध्ये त्यांना सध्याच्या ग्रा. पं. पी.डी.ओ., ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि येळ्ळूरवासियांचे मोलाचे सहकार्य लाभले.

भूमिपूजन समारंभास शाळेचा संपूर्ण शिक्षकवर्ग, एस.डी.एम.सी., शिक्षणप्रेमी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस्. बी. पाखरे यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एस्. आर. निलजकर यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.