बेळगाव लाईव्ह : महाशिवरात्रीनिमित्त बेळगाव शहर आणि परिसरातील शिवालये भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले.
दुपारी विशेष होम आणि अभिषेक करण्यात आला. भाविकांनी यावेळी आवर्जून उपस्थिती लावली. तसेच मिलिटरी महादेव, बिस्किट महादेव, वीरभद्र देवस्थान, मल्लिकार्जुन देवस्थान वडगाव, कॅम्प येथील बिस्किट महादेव-महादेव शंभू जत्ती मंदिर,
महादेव गल्ली येथील पुरातन देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री उमा रामेश्वर मंदिर, कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर यासह सर्वच शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक विधी पार पडले. दरम्यान, सर्व शिवमंदिरांच्या प्रवेशद्वारापाशी बेल, फुले, पत्री आदी साहित्याची तेजीने विक्री झाल्याने विक्रेतेही आनंदित झाले.
गुरुवारी रात्री पासूनच शिवालयांमध्ये अभिषेक, विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होती. पहाटे पाच वाजेपर्यंत अनेक शिवालयांमधून अभिषेक विधी सुरु होता. महाशिवरात्रीनिमित्त विविध शिवालयांमध्ये विशेष रुद्राभिषेक करण्यात आला.
तसेच लघुरुद्राभिषेक, पंचामृताभिषेक, महाआरती, पूजन आणि दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग असे चित्र दिसून आले. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी गुरुवारी रात्रीपासूनच कपिलेश्वर देवस्थानात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.