बेळगाव लाईव्ह: बेळगाव लोकसभा मतदारसंघातून अखेर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. शनिवारी रात्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देशातील 111 जागांच्या उमेदवारी जाहीर केल्या त्यात कर्नाटकाच्या देखील चार जागांचा समावेश आहे. शनिवारी जाहीर झालेल्या सूचीमध्ये बेळगाव मधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर रायचूर मधून राजा अमरेश्वर नाईक कारवार मधून विश्वेश्वर कागेरी हेगडे आणि चिकबळापूर मधून डॉ के सुधाकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शेट्टर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर विरुद्ध भाजपचे जगदीश शेट्टर असा मुकाबला होणार आहे तर कारवार मतदार संघातून काँग्रेसच्या अंजली निंबाळकर विरुद्ध विश्वेश्वर हेगडे कागेरी अशी लढत रंगणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यास स्थानिक भाजप नेत्याकडून सुरुवातीला विरोध करण्यात आला होता मात्र भाजप हाय कमांडने नाराजांची मनधरणी केल्यानंतर शेट्टर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी जगदीश शेट्टर हे भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते आणि काँग्रेसकडून त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती मात्र हुबळी मधून त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर लागलीच काँग्रेस कडून त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले होते.
माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टर हे पुन्हा लोकसभा उमेदवारी देण्याच्या अटीवरच भाजपामध्ये स्वगृही परतले होते मात्र धारवाड मधून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तर हावेरी मधून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेट्टर यांना उत्तर कर्नाटकात उरलेली जागा बेळगाव मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
कारवार लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अनंत कुमार हेगडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून बेळगावच्या विद्यमान खासदार मंगला अंगडी यांना देखील उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांचे व्याही असलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगाव मधून उमेदवारी देण्यात आली आहे