बेळगाव लाईव्ह:आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बेळगाव मतदार संघातील आपली उमेदवारी जातिवंत शेतकरी अथवा शेतकरी नेत्याला द्यावी. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा देण्याद्वारे सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री करावे; अशा आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय रयत संघ अर्थात अर्थात कर्नाटक राज्य रयत संघाचे नेते प्रकाश नायक यांनी दिली.
शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शेतकरी नेते प्रकाश नायक म्हणाले की, आपल्या हक्कासाठी आणि मागण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर आंदोलन छेडून कंठशोष करावा लागतो. त्यांना आदराने वागवले जात नाही. कार्यालयात बोलावून शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याऐवजी त्यांना रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून अडविले जाते.
नेतेमंडळी देखील रस्त्यावरच निवेदने स्वीकारून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसतात. या उलट साधे राजकीय कार्यकर्ते थेट त्या नेत्यांपर्यंत जाऊन त्यांची भेट घेतात. हा दुजाभाव का? आम्ही शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला आहे? ही गोष्ट आम्ही आता गांभीर्याने घेतली आहे. आपल्या समस्यांचे निवारण आणि मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी शेतकरी शेतकरी नेते यांना स्वतःच आता लोकसभा विधानसभा अथवा मंत्रालयामध्ये जावे लागणार, हे आमच्या लक्षात आले आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जावे डाॅ. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळावेत अशी आमची मागणी आहे. जेणेकरून कृषी क्षेत्राची भरभराट होऊन आपले राष्ट्र आणखी मोठे होईल या अनुषंगाने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जातिवंत शेतकरी किंवा शेतकरी आंदोलकांना उमेदवारी द्यावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी आम्ही बेळगाव दौऱ्यावर येत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमोर देखील ठेवणार आहोत. माननीय पंतप्रधान येत्या काळात आपला देश जगातील बलाढ्य राष्ट्र बनेल असे म्हणतात तसे झाल्यास आमचे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होईल, आम्हाला आमची किंमत मिळेल, आमचे जीवन सुखकर होईल, असे आमचे स्वप्न आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे बेंगलोर येथे नुकतीच बॉम्बस्फोटाची घटना घडली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी देश विरोधी घोषणा देण्याचा प्रकारही घडला आहे. या दोन्ही प्रकारांचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था हातळण्यात असमर्थ ठरले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार विशेष करून राज्य सरकारने यंदाची दुष्काळी परिस्थिती व्यवस्थित हाताळलेली नाही. या सर्व कारणास्तव माझी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की त्यांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्याला आजपर्यंत मुख्यमंत्रीपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे आमचे लोकाभिमुख नेते सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री केले जावे. कारण ते एक सज्जन आणि सर्वांना सांभाळून स्वतःसोबत घेऊन जाणारे व्यक्ती आहेत. यापूर्वी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यातही सतीश जारकीहोळी यांचा वाटा मोठा आहे. तेंव्हा सिद्धरामय्या यांनी आता स्वतःहून मुख्यमंत्री पदावरून बाजूला होत शेतकऱ्यांची काळजी असलेल्या सतीश जारकीहोळी यांना ते पद द्यावे, अशा आमच्या दोन मागण्या असल्याचे राष्ट्रीय रयत संघाचे नेते प्रकाश नायक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस चुन्नप्पा पुजारी, किशन नंदी, बबन मेलगे, सुरेश परगण्णवर, पांडू गिरणगड्डी, सुरेश संपगावी, यल्लाप्पा बेळगावकर आदी शेतकरी संघटनेचे अन्य नेते उपस्थित होते.