Sunday, May 12, 2024

/

आर्ट्स सर्कलच्या एक दिवसीय संगीत मैफिल

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आर्ट्स सर्कलच्या एक दिवसीय संगीत मैफिलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.‌ सकाळी ठीक १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी कलाकारांचे स्वागत केले.

कलाकारांची ओळख आणि प्रातःकालीन सत्राचे सूत्रसंचालन श्रीधर कुलकर्णी ह्यांनी केले. प्रारंभी पतियाळा घराण्याच्या उदयोन्मुख गायिका‌ पं. अजय चक्रवर्ती ह्यांच्या शिष्या संगबर्ती दास ह्यांचे गायन झाले. त्यांना तबला साथ दिली बिभास सांघाई ह्यांनी आणि संवादिनी साथ दिली रवींद्र माने ह्यांनी. पावनी ऐरसंग ह्यांनी तानपुरा साथ दिली. संगबर्ती ह्यांनी आपल्या गायनाची सुरुवात प्रातःकालीन राग तोडीने‌ केली.

विलंबित एकतालातील ख्याल, द्रुत तीनतालातील एक बंदिश आणि त्यानंतर एकतालातील तराना त्यांनी सादर केला. महाराष्ट्रात पं. भीमसेन जोशी ह्यांनी अजरामर केलेले तीर्थ विठ्ठल हे संत नामदेवांचे भजन त्यानंतर त्यांनी सादर केले आणि आपल्या गायनाची सांगता केली.

 belgaum

त्यानंतर पं. उल्हास कशाळकर ह्यांचे शिष्य अलिक सेनगुप्ता ह्यांचे गायन झाले. त्यांना तबला साथ दिली बिभास सांघाई ह्यांनी आणि संवादिनी साथ दिली सारंग कुलकर्णी ह्यांनी, तानपुर्‍यावर होती निधी केळकर. आपल्या गायनाची सुरुवात अलिक ह्यांनी राग: जौनपुरीने केली. अब रंग घोलिया ही विलंबित तिलवाड्यातील बंदिश आणि द्रुत तीनतालातील एक बंदिश त्यानंतर त्यांनी सादर केली. राग: अल्हैय्या बिलावल मधील मध्यलय झपतालातील एक बंदिश आणि त्यानंतर द्रुत तीनतालातील तराना त्यांनी सादर केला. सहसा न ऐकायला मिळणार्‍या अशा राग हिंडोल बहारमधील‌ दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. पहिली बंदिश मध्यलय रूपक मध्ये आणि द्रुत बंदिश तीनतालात होती. त्यांच्या गायनाने सकाळच्या सत्राची समाप्ती झाली.Arts circle

सायंकालीन सत्राचे सूत्रसंचालन केले ॲड् रवींद्र माने यांनी, कलाकारांची ओळख त्यांनी करून दिली. लता कित्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले. सुरुवातीला उस्ताद अबीर हुसेन ह्यांचे सरोद वादन झाले. त्यांना तबला साथ होती अजिंक्य जोशी ह्यांची. आपल्या वादनाच्या सुरुवातीला त्यांनी राग शुद्ध कल्याण सादर केला. मध्यलय झपतालील आणि त्यानंतर द्रुत तीनतालातील‌ अशा दोन बंदिशी सादर केल्या.‌ राग: शुद्ध पिलूमधील‌ एक धुन‌ सादर करून आपल्या वादनाची सांगता त्यांनी केली.

कार्यक्रमाची सांगता पद्म श्री पं. उल्हास कशाळकर ह्यांच्या गायनाने झाली. त्यांना देखील तबला साथ केली अजिंक्य जोशी ह्यांनी आणि संवादिनी साथ केली सारंग कुलकर्णी ह्यांनी. वसंत ऋतूच्या सुरुवातीचा काळ आहे म्हणून त्यांनी
राग वसंत सादर केला. विलंबित तिलवाड्यातील नबी के दरबार ही पारंपारिक बंदिश त्यांनी सादर केली आणि त्यानंतर अद्धातालातील पं. दिनकर कायकिणी रचित वसंत ऋतूचे वर्णन करणारी बंदिश त्यांनी सादर केली. त्यानंतर तीनतालीत तराना त्यांनी सादर केला. वसंताच्या जोडीने येणारा राग बहार त्यांनी त्यानंतर सादर केला. मध्य लय तीनतालातील एक बंदिश आणि द्रुत एकतालातील एक बंदिश त्यांनी सादर केली. जमुना के तीर ह्या भैरवीने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. रवींद्र माने ह्यांनी कलाकारांचे, श्रोत्यांचे, लोकमान्य रंगमंदिराचे, पत्रकारांचे आणि इतर सर्वांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.