बेळगाव लाईव्ह :भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) आपले विमानतळांचे नवीनतम ग्राहक समाधान निर्देशांक जाहीर केले असून त्यात भोपाळचे राजा भोज विमानतळ निर्दोष 5 गुणांसह देशातील अग्रगण्य विमानतळ म्हणून प्रथम क्रमांकावर झळकले आहे. बेळगाव विमानतळ देखील चमकले असून 5 पैकी 4.97 गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर आहे.
गेल्या 2023 च्या पहिल्या सत्राच्या तुलनेत 2023 च्या दुसऱ्या सत्रात एएआयच्या ग्राहक समाधान निर्देशांकात बेळगाव विमानतळ चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. सर्व सहभागी विमानतळांवरील 33 निकषांचे सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यात आले.
या मूल्यमापनात, बेळगाव विमानतळाने 4.97 गुण मिळवले, बेळगाव मागोमाग 4.95 गुणांसह हुबळी विमानतळाचा क्रमांक लागतो. दरम्यान, एएआयच्या ग्राहक समाधान सर्वेक्षणात भोपाळ विमानतळाने 5 पैकी 5 गुणांसह प्रथम स्थानावर दावा केला आहे. विशेष म्हणजे, कर्नाटकातील म्हैसूर आणि कलबुर्गी या इतर दोन विमानतळांनी अनुक्रमे 22 वे आणि 29 वे स्थान मिळवले आहे.
एएआयच्या ग्राहक समाधान निर्देशांक निश्चित करण्याच्या प्रक्रियेत देशातील 58 विमानतळांचा सहभाग होता. ज्यामध्ये प्रत्येक श्रेणीतील उत्कृष्ट असलेल्या पाच विमानतळांची निवड करण्यात आली. त्याच निकषांच्या आधारे बेळगाव विमानतळाचेही मूल्यांकन केले गेले.
यापैकी एएआयच्या ग्राहक समाधान निर्देशांक संबंधित कांही निकषांमध्ये वाहतूक, पार्किंग सुविधा, बॅगेज कार्ट ट्रॉलीची उपलब्धता, चेक -इन, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, सुरक्षा तपासणीची पूर्णता, रेस्टॉरंट, खाण्याच्या सुविधा, वेटिंग आणि गेट एरिया, इंटरनेट /वायफाय उपलब्धता यांचा विचार केला जातो.