बेळगाव लाईव्ह:संडे ट्रेकर्स ग्रुपने नुकतीच बेळगावच्या उत्तरेकडील बंबरगा, कट्टणभावी, निंग्यानट्टी आणि गोरामट्टी या गावांना भेट देऊन जलसंवर्धक डॉ. शिवाजी कागणीकर यांनी तयार केलेल्या वॉटर शेड प्रकल्पाचा अभ्यास केला.
बंबरगा, कट्टणभावी, निंग्यानट्टी आणि गोरामट्टी या ठिकाणी डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या पुढाकाराने लावलेली जवळपास 2,00,000 पेक्षा जास्त झाडे आपण आजही पाहू शकतो.
विशेष म्हणजे त्यात फळझाडांची संख्या भरपूर आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे अरिष्ठ लक्षात घेऊन डॉ. कागणीकर यांनी जमिनीत पावसाचे पाणी झिरपण्यासाठी डोंगर उतारावर गावकऱ्यांच्या मदतीने वाहुन जाणारे पाणी अडविण्यासाठी चरी खोदल्या व त्याच्याशेजारी स्थानिक झाडे लावली. बंबरगा येथे योग्य जागा बघून छोटा चेक-डॅम देखील तयार केला आहे.
कट्टणभावी, निंग्यानट्टी आणि गोरामट्टी या आजूबाजूच्या गावांमध्ये तलाव आणि विहिरी खोदून पाणी साठण्यासाठीचे प्रयत्न केले आणि आज ते सर्व यशस्वी झाले आहेत. डॉ शिवाजी कागणीकर यांनी हे सर्व काहीं सरकारी निधीशिवाय एका जर्मन मित्राच्या मदतीने केले हे विशेष होय. संडे ट्रेकर्स ग्रुपच्या बंबरगा, कट्टणभावी, निंग्यानट्टी आणि गोरामट्टी येथील अभ्यास दौऱ्या दरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. कागणीकर जातीने उपस्थित होते.
त्यांच्याकडून भाजप नेते शंकरगौडा पाटील यांनी वनीकरण आणि जलसंवर्धना संदर्भातील माहिती जाणून घेतली. याप्रसंगी ॲड. एन.आर. लातूर, अजय आचार्य, राहुल पाटील, जी. अभिषेक, गुंडू मस्तमर्डी, ॲड. दरेप्पा बिळगी, रोहन लातूर आदीसह संडे ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य हजर होते.