बेळगाव लाईव्ह :आपण पोलीस आहोत पुढे चोरी झाली आहे अशी बतावणी करून सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका इसमाची सोन्याची चेन, अंगठ्या असा अंदाजे सुमारे 2 लाख रुपये किमतीचा ऐवज भामट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना जुने बेळगाव -हलगा रस्त्यावर आज सकाळी घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मूळचे चंदगडचे असणारे साळुंखे नामक इसम आपल्या सासुरवाडीला जुने बेळगाव येथे आले आहेत. मॉर्निंग वॉकची सवय असलेले साळुंखे आज शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे जुने बेळगाव येथून हालग्याच्या दिशेने फिरावयास निघाले होते.
त्यावेळी वाटेत मोटरसायकल वरून आलेल्या एका इसमाने त्यांना अडविले. तसेच आपण पोलीस आहे, पुढे चोरी झाली आहे. त्याची चौकशी तपास सुरू असून असे खुलेआम सोन्याचे दागिने घालून जाऊ नका, असे त्याने साळुंखे यांना सांगितले.
तसेच गळ्यातील चेन आणि हातातील अंगठ्या काढून खिशात ठेवा असा सल्ला दिला. एवढे करून न थांबता त्या भामट्याने रुमाल घेऊन आपल्या दुचाकीच्या सीटवर पसरवला व त्यामध्ये साळुंखे यांच्या गळ्यातील 30 ग्रॅमची सोन्याची चेन, हातातील 5 -5 ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि घड्याळ बांधून रुमालाचे गाठोडे साळुंखे यांच्या हातात दिले. त्यानंतर जवळच थांबलेल्या अन्य एका इसमाला त्या भामट्याने साळुंखे यांच्या समक्ष हटकले. त्यावेळी त्या इसमाने आपल्या बॅगेत 50 हजार रुपये असल्याचे सांगितले. तेंव्हा तुम्हाला सुरक्षित सोडतो चला असे सांगून तो भामटा त्या इसमाला आपल्या दुचाकीवरून घेऊन गेला. अल्पावधीत घडलेल्या या घटनेमुळे भांबावलेल्या साळुंखे यांनी पुढे येऊन रुमालाची गाठ सोडून पाहिले असता त्याला धक्काच बसला.
कारण रुमालात फक्त घड्याळ दिसले, सोन्याची चेन आणि अंगठ्या गायब झाल्या होत्या. भामट्याने लांबविलेल्या साळुंखे यांच्या चेन व अंगठ्यांची किंमत सुमारे 2 लाख 50 हजार रुपये इतकी होते.
एकंदर प्रकार पाहता बॅगेत 50 हजार रुपये आहेत असे सांगणारा तो अन्य इसम दखील त्या भामट्याचा साथीदारच असावा असा कयास आहे. आपण लुबाडलो गेलो हे लक्षात येताच साळुंखे यांनी तातडीने शहापूर पोलिसांना घटनेची माहिती दिल्याचे समजते. दरम्यान पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर या चोरीचा तपास सुरू होणार आहे.