बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावतर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 5 वाजता ‘से नो टू ड्रग्स’ या शीर्षकाखाली भव्य 13 व्या बेळगाव अर्ध मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून ही बेळगावातील जुनी मॅरेथॉन शर्यत असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी दिली.
कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श पॅलेस येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अध्यक्ष संजीव देशपांडे म्हणाले की, गेल्या 2008 सालापासून रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव अर्ध मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करत असून यंदाचे हे 13 वे वर्ष आहे.
यंदाची शर्यत अंमली पदार्थांच्या निषेधार्थ तसेच लोकांमध्ये तंदुरुस्त आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. सदर शर्यत चार गटांमध्ये घेण्यात येईल.
बेळगाव अर्ध मॅरेथॉन ही मुख्य शर्यत 21.095 कि.मी. अंतराची असणार असून या व्यतिरिक्त 10 कि.मी, 5 कि.मी. आणि 3 कि.मी. पण रन /वॉक अशा तीन गटात शर्यत होईल. येत्या रविवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता सीपीएड कॉलेज मैदानावरून सुरू होणारी ही शर्यत पुन्हा त्या ठिकाणीच समाप्त होईल. शर्यतीचा मार्ग निसर्गरम्य कॅन्टोन्मेंट परिसरातील असणार आहे. शर्यतीतील विजेत्यांना पदकासह रोख रकमेची आकर्षक पारितोषिके दिली जातील.
त्याचप्रमाणे सर्व गटांमध्ये नोंदणीकृत धावपटूंना पदकं, शर्यतीनंतर अल्पोपहार, उत्तम क्वालिटीचे इव्हेंट टी-शर्ट, टायमिंग सर्टिफिकेट, इव्हेंट फोटोग्राफ्स यासह शर्यतीदरम्यान हायड्रेशन सपोर्ट आणि वैद्यकीय मदत देऊ केली जाणार आहे. यंदाच्या या भव्य शर्यतीत बेळगावसह देशातील विविध ठिकाणचे सुमारे 3000 धावपटू भाग घेणार आहेत.
विशेष म्हणजे यंदाच्या शर्यतीमध्ये प्रथमच आंतरशालेय खुल्या क्रॉस कंट्री शर्यतीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ही शर्यत 17 वर्षाखालील मुला -मुलींसाठी सांघिक पातळीवर 5 कि.मी. अंतराची असणार आहे. बेळगाव अर्ध मॅरेथॉन शर्यतीसाठीची नांव नोंदणी रन इंडिया वेबसाईटवर (www.runindia.in.) सुरू झाली आहे. नांव नोंदणीची अंतिम तारीख गुरुवार दि. 8 फेब्रुवारी 2024 ही आहे. तरी शर्यतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी 8283875150 किंवा 9844480030 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच शर्यतीच्या माहितीसाठी www.rotarybhm.in या वेबसाईटला भेट द्यावी.
शर्यतीसाठी नांव नोंदणी केलेल्या धावपटूंना त्यांचे चेष्ट नं. /बिब नं. शर्यतीच्या ठिकाणी सीपीएड मैदानावर शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी वितरित केले जातील अशी माहिती देऊन हौशी व व्यावसायिक धावपटूंनी मोठ्या संख्येने या शर्यतीत भाग घेऊन ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन संजीव देशपांडे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर मॅरेथॉन शर्यतीचे संचालक जगदीश शाईन, लतेश पोरवाल, लोकेश होंगल, सोमनाथ कुडचीकर, क्लबचे ज्येष्ठ सदस्य डी. बी. पाटील, डॉ रवी पाटील आदी उपस्थित होते.