बेळगाव लाईव्ह:महात्मा फुले रोड शहापूर येथील तुकाराम बँकेच्या आवारात पार्किंगच्या जागेत लावलेली मोटरसायकल चोरट्याने शिताफिने लांबवल्याची घटना आज मंगळवारी सकाळी 11:45 वाजण्याच्या सुमारास घडली. या पद्धतीने आवारातील पार्किंगमधून मोटरसायकल चोरीला गेल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
चोरीला गेलेली मोटरसायकल तुकाराम बँकेतील कर्मचारी महेश बाळू पवार (रा. बसवान गल्ली, शहापूर) यांच्या मालकीची आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, महेश हे आज सकाळी नेहमीप्रमाणे बँक आवारात कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पार्किंगच्या जागेत आपली स्प्लेंडर (क्र. केए 22 ईडब्ल्यू 3364) पार्क करून बँकेत कामावर रुजू झाले होते.
त्यानंतर दुपारी 2:30 वाजता जेवणाच्या सुट्टीत ते घरी जाण्याकरिता पार्किंगच्या ठिकाणी आले असता आपली मोटरसायकल जागेवर नसल्याचे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेंव्हा संशयावरून त्यांनी पार्किंगच्या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता 11:47 वाजता एका चोरट्याने हॅण्डल लॉक तोडून मोटरसायकल लंपास केल्याचे दिसून आले.
आपली मोटरसायकल चोरीला गेल्याने धक्का बसलेल्या महेश पवार यांनी मोटरसायकल चोरीची ऑनलाइन पोलीस तक्रार नोंदविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज बँकेच्या सिक्युरिटी गार्डने सुट्टी घेतली होती.
त्यामुळे चोरट्याचे काम अधिकच सुलभ झाले. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही या पद्धतीने आवाराच्या आत पार्क केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत असून परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.