बेळगाव लाईव्ह : सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठे पाऊल उचलले जात आहे. सर्वसामान्यांना तांदूळ उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ‘भारत तांदूळ’ ही योजना सुरू केली आहे. मात्र, या योजनेंतर्गत अद्याप तांदळाचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी भारत तांदळाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
या योजनेंतर्गत प्रतिकिलो २९ रुपये दराने चांगल्या प्रतिचा तांदूळ दिला जाणार आहे. मात्र, अद्याप तांदूळ वितरणाला प्रारंभ झाला नाही. शासनाकडून भारत तांदूळ या योजनेबाबत अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि संबंधितांशी चर्चा केली जाणार आहे. शासनाकडून आदेश आणि पुरवठा झाल्यानंतर नागरिकांना वितरण केले जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याचे साहाय्यक निर्देशक एच. बी. पीरजादे यांनी दिली.
यंदा पावसाअभावी काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना तांदूळ मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना तांदूळ उपलब्ध व्हावा, यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. मात्र, सरकारकडे पुरेसा तांदूळ साठा नसल्याने योजनेची अंमलबजावणीत अडचणी आल्या आहेत. केंद्र सरकारने एपीएल, बीपीएल सर्वांनाच हा तांदूळ मिळेल, अशी घोषणा केली आहे. मात्र, अद्याप या योजनेची प्रत्यक्षात वितरणाची प्रक्रिया रखडली आहे. या योजनेबाबत अद्याप सर्वसामान्य अनभिज्ञ आहेत. त्यामुळे महिला व बाल कल्याण खात्याला जनजागृतीचे काम हाती घ्यावे लागणार आहे.
राज्यात काँग्रेस सरकारने अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती १० किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. मात्र, पुरेशा साठ्याअभावी तांदळाऐवजी निधी दिला जात आहे. सद्यपरिस्थितीत 5 किलो तांदूळ आणि माणसी १७० रुपये दिले जात आहे. मात्र काही कुटुंबांना देण्यात येणारा तांदूळ कमी पडू लागला आहे. शिवाय पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे धान्याची कमतरता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत भारत तांदूळ योजना सोयीस्कर ठरली असती. मात्र अद्याप या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भारत तांदूळ कधी मिळणार? असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.