बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली असून महापौर पदाची राखीवता असलेल्या दोन्ही नगरसेविका केवळ भाजपकडेच असल्यामुळे महापौर पद बिनविरोध त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तथापि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असली तरी त्यामध्येही भाजपचा वरचष्मा असण्याची शक्यता आहे.
बेळगाव महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी रोजीच संपला असल्यामुळे सोमनाचे यांना 15 फेब्रुवारीपर्यंत काळजीवाहू महापौर म्हणून मुदत वाढ देण्यात आली आहे.
बेळगाव महापालिकेचे 22 वे महापौर पद अनुसूचित जाती (महिला) वर्गासाठी आरक्षित आहे. त्यासाठी संपूर्ण सभागृहात केवळ भाजपच्या सविता कांबळे (प्रभाग 17) आणि लक्ष्मी राठोड (प्रभाग 35) या पात्र आहेत. परिणामी निवडणूक बिनविरोध होऊन भाजपचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे.
उपमहापौर खुल्या वर्गासाठी आरक्षित असल्यामुळे या पदासाठी भाजपचे दोन नगरसेवक पात्र आहेत. काँग्रेसकडूनही कांहीजण इच्छुक असल्यामुळे उपमहापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे बहुमत असल्यामुळे या निवडणुकीतही भाजपच विजय होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत ऑपरेशन हस्त राबवून सत्ता ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून अंतर्गत प्रयत्न होत होते. मात्र आता महापौर पदाची राखीवता असलेल्या नगरसेविका केवळ भाजपकडेच असल्यामुळे ऑपरेशन हस्त थंडावले आहे. तथापि महापौर पदाच्या उमेदवाराचे नांव मतदानावेळी जाहीर करण्यात येईल, असा निर्णय घेऊन भाजपने सावधानता बाळगली आहे.
आता येत्या गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होईल. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरणा, छाननी, माघार आणि त्यानंतर गरज भासल्यास हात उंचावून मतदान घेण्यात येणार आहे. अन्यथा बिनविरोध निवडूची घोषणा केली जाईल. महापौर -उपमहापौर निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर हे काम पाहणार आहेत.