बेळगाव लाईव्ह :लाच मागितल्याच्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त विभागाने आज गुरुवारी बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयावर (डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ऑफिस) छापा टाकून 22 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरला रंगेहात पकडले. यामुळे नोंदणी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
लोकायुक्त पथकाने अटक केलेल्या आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरचे नांव सोमशेखर मास्तमर्डी असे आहे. बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयात आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या सोमशेखर याने विक्रीचे (सेल डिड) चलन देण्यासाठी अविनाश धामणेकर नामक व्यक्तीकडे 22 हजार रुपयांची मागणी केली होती.
यासंदर्भात धामणेकर यांनी सोमशेखरच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार लोकायुक्त ठाण्यात केली होती. सदर तक्रारीची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उस्मान आवटी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून आज गुरुवारी दुपारी 12.30 वा. नोंदणी कार्यालयावर धाड टाकली. तसेच सोमशेखर मास्तमर्डी याला 22 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली.
लोकायुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हनुमंत रायाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तथापि नोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात लुबाडले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र या कारवाईचे स्वागत होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.