बेळगाव लाईव्ह: वार्षिक परीक्षांची वेळ जवळ आली असून विद्यार्थीवर्ग आता परीक्षेच्या तयारीत व्यस्त झाला आहे. शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली असून दहावी-बारावीसह सर्वच विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहे.
यंदा १३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान पीयूसी प्रथम वर्षाची परीक्षा होणार आहे. त्यापाठोपाठ पीयूसी द्वितीय वर्षाची मुख्य परीक्षा, त्याचबरोबर दहावीची पूर्वतयारी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासाला लागले आहेत. पीयूसी द्वितीय वर्षाची पूर्वतयारी परीक्षा दि. १६ ते २९ जानेवारीदरम्यान पार पडली असून यानंतर आता प्रथम वर्षाची अंतिम परीक्षा होणार आहे.
यासाठी महाविद्यालयांमधून तयारी सुरू करण्यात आली आहे. दि. १३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान प्रथम वर्षाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करणे, मॉडेल प्रश्नपत्रिका सोडविणे यामध्ये विद्यार्थीवर्ग व्यस्त झाला आहे.
सोमवार दि. २६ फेब्रुवारीपासून दहावीची पूर्वतयारी परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेचा सराव व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरुप समजावे, यासाठी पूर्वतयारी परीक्षा घेतली जाणार आहे.
सध्या प्रात्यक्षिक परीक्षा शाळांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वतयारी परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यानंतर मार्च महिन्यात इतर वर्गांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.