बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील वादग्रस्त जमिनीसंदर्भात आज शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सर्व्हे करून खांब लावण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तसेच एजंट आणि कामगारांना सळो कि पळो करून सोडले.
खादरवाडी येथे ४२ एकर जमीन हि वादातीत आहे. या जमिनीचा व्यवहार भूमाफियांच्या माध्यमातून करण्यात आला असून सदर व्यवहार रद्द करून कब्जेदार शेतकऱ्यांच्या नावावर जमीन परत केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी खादरवाडी येथे सदर जमीन कब्जेदार शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत समस्त शेतकरी संघटना गावकरी महिला मंडळ आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या जमिनीसंदर्भात काही निर्णय घेण्यात आले होते. या जागेवर असलेल्या झऱ्याचे पाणी गेल्या १०० वर्षांपासून खादरवाडी ग्रामस्थ वापरत आहेत. तसेच या जमिनीवरील चारदेखील व्यवहारानंतर जाळून टाकण्यात आल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या सर्वगोष्टींचा विचार करून सदर व्यवहार रद्द करून जमीन पूर्ववत कब्जेदार शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. येत्या ११ मार्च पर्यंत या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
भूमाफियांनी संपूर्ण जमिनीतील चाऱ्याला आग लावून जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे. याचीही जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली. मात्र बुधवारी सकाळी पुन्हा एजंट, अधिकारी आणि कामगारांनी जमिनीवर खांब लावण्यासाठी उपस्थिती दर्शविली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आणलेले खांब फेकून देत एजंट, अधिकारी आणि कामगारांना पिटाळून लावले.