बेळगाव लाईव्ह : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी ‘कन्नड भाषा समग्र विकास’ (दुरुस्ती) विधेयकाला संमती मिळाली. यानंतर बेळगाव शहरात नाम फलकावरील 60 टक्के कन्नड सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली असून आज बुधवारी सकाळी महापालिका अधिकाऱ्यांच्या पथकांनी आणि कन्नड संघटनांनी शहरातील विविध भागात फिरून दुकाने, हॉटेल वरील अन्य भाषेतील नामफलक हटविले.यापूर्वी मराठी भाषेत असणारे फलक प्रशासन आणि कन्नड संघटनांनी हटविले होते.
मात्र सदर विधेयकाला संमती मिळाल्यामुळे आज कन्नड संघटनानी शहरातील विविध ठिकाणचे इंग्रजी भाषेतील फलक देखील हटविले.
महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून नाम फलकावरील कन्नड सक्ती आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. आयुक्त लोकेश यांच्या सूचनेनुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी आज शहरातील विविध भागात फिरून दुकानांवरील अन्य भाषेतील नामफलक उतरवण्याबरोबरच दुकानदारांना नाम फलकामध्ये नियमानुसार कन्नडला अधिक प्राधान्य देण्याची सूचना केली. यापुढे सदर नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दुकानांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही महापालिका अधिकाऱ्यांनी दुकानदारांना दिला.
राज्य सरकारच्या आदेशानुसार दुकाने, व्यापारी आस्थापने, मॉल वगैरेंच्या नाम फलकांमध्ये 60 टक्के कन्नड भाषेचा आणि उर्वरित 40 टक्के इतर भाषेचा वापर केला गेला पाहिजे. सदर आदेश जारी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने दुकानदारांना पुरेसा अवधी दिला होता.
सदर कालावधी समाप्त झाला असल्यामुळे नाम फलकावरील कन्नड सक्तीच्या आदेशाची आता काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. सदर आदेशाचे तात्काळ पालन केले जावे, अन्यथा संबंधितांचा व्यापारी परवाना रद्द केला जाईल, असा इशारा महापालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे.