बेळगाव लाईव्ह: राज्यातील दुकाने, आस्थापने वगैरेंच्या नामफलकांवरील कन्नड सक्तीच्या आदेशासंदर्भात आज गुरुवारी घोषणा करताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेंगलोरमध्ये नामफलकावरील 60 टक्के कन्नड सक्तीच्या अंतिम मुदतीमध्ये दोन आठवड्यांनी वाढ जाहीर केली आहे.
कर्नाटक सरकारने व्यावसायिक आस्थापने आणि कार्यालयांच्या 60 टक्के कन्नड भाषेतील मजकूर असलेले नामफलक लावण्याच्या आवश्यकतेचे पालन करण्यासाठी अतिरिक्त दोन आठवड्याचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
“सिग्नेज जाहिरातींसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने 60 टक्के कन्नड करिता साइनेज नियमांचे पालन सुलभ करण्यासाठी व्यावसायिक आस्थापनांची अंतिम मुदत दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एक्सवर शेअर केले.
मातृभाषेचा सन्मान करण्याचे महत्त्व अधोरेखित करून शिवकुमार म्हणाले की, “आपण आपल्या मातृभाषेला अत्यंत आदराने जपले पाहिजे. त्यामुळे, दोन आठवड्यांच्या वाढीव कालावधीत या नियमाचे पूर्ण पालन होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”