बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने नुकतेच कन्नड भाषा समग्र विकास विधेयक संमत केले असून सीमाभागात कर्नाटक सरकार दडपशाहीने कन्नडसक्ती करत आहे. या विरोधात आज महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष पुरवून होणारी दडपशाही रोखावी असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारने विधिमंडळात संमत केलेल्या विधेयकानुसार व्यावसायिकांना दुकानावरील फलकावर ६० टक्के कन्नड मजकूर सक्तीचा केला आहे. याबाबत महानगरपालिका अधिकाऱ्यांमार्फत व्यावसायिकांवर दडपशाही करत आहे. दडपशाहीचे धोरण अवलंबणाऱ्या प्रशासनाकडून व्यावसायिकांना वेठीला धरण्यात येत आहे. सीमाभागात बहुतांशी फलक हे मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहेत.
परंतु बेळगाववर कन्नड भाषेचे अधिक प्राबल्य दाखविण्यासाठी कर्नाटक सरकार काही कन्नड संघटनांना हाताशी धरून मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार, प्रशासन आणि मनपा ची सुरु असलेली दडपशाही, दादागिरी विरोधात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली, त्यादरम्यान कर्नाटक सरकारशी लवकरच संपर्क साधून सीमाभागातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या सूचना करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होती. केंद्र सरकारनेही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्याचे आदेश दिले होते.
मात्र याकडे दुर्लक्ष करत कर्नाटक सरकार दडपशाहीने सीमावासीयांना डिवचण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्र सरकारने तातडीने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
सदर निवेदन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींच्या सहीनिशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.